मुंबई: नितेश राणे जे बोलले ते चूकच आहे. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना फटकारले. तसेच नितेश राणेंच्या माध्यमातून विरोधकांचा एक सदस्य निलंबित करण्याचा सरकारचा डाव आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या चर्चेत भाग घेताना देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना फटकारतानाच सरकारच्या मनसुब्यांचीही पोलखोल केली. विरोधी पक्षाकडे पाहायचंच नाही असा नवा पायंडा पडला आहे का. असं काही ठरलं आहे का? आम्ही लोकशाहीत लढणारे लोकं आहोत. रडणारे नाहीत. या ठिकाणी नितेश राणे संदर्भात उपस्थित झाला. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी असं वागू नये, असं फडणवीस म्हणाले.
याच सभागृहात छगन भुजबळ तिकडे बसायचे. भास्कर जाधव सहीत आम्ही सर्व या साईटला बसायचो. जेव्हा भुजबळ सभागृहात आल्यावर हूप हूप करून त्यांना डिवचणारे भास्कर जाधवहीही होते. हे आम्ही पाहिलं आहे. या सभागृहाने हे पाहिलं आहे. त्याचंही समर्थन नाहीये. सभागृहाबाहेर जी काही घटना घडली त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण जर हे ठरवून आले असतील आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्या सदस्याला निलंबित करायचं ठरलं असेल तर हे लोकशाहीत योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.
आमचे 12 सदस्य निलंबित केले. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. आम्हाला आनंद नाही. या सभागृहावर न्यायालयाचा अधिक्षेप राहावा असं आम्हाला वाटत नाही. पण ही वेळ आमच्यावर तुम्ही आणत आहात. या ठिकाणी कायदा आणि संविधान पाळलं जात नाही. मनमानीपणे सदस्यांना एक वर्ष निलंबित करणे योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.
नितेश राणे जे बोलले ते चुकीचं आहे हे मी जाहीर बोललो. माझा सदस्य असला तरी ते चुकीचं आहे हे सांगण्याची हिंमत आमच्यात आहे. पण तुमचा डाव लक्षात येतोय. तुम्हाला एक सदस्य निलंबित करायचा आहे. 12 सदस्य निलंबित करायचं आहे. लोकसभेत एका सेशन पुरतं सदस्यांना निलंबित केलं. पण इथे वर्षभरासाठी केलं. तुम्ही कितीही निलंबनाची कारवाई केली तरी आम्ही लढू. पण जे ठरवून चाललं आहे ते योग्य नाही. आम्ही सदस्यांना जाब विचारू. सरकार बदलत असतात. पायंडा पाडला तर येणारं सरकार कोणत्याच विरोधकांना ठेवणार नाही. लोकशाहीची हत्या होईल, असं ते म्हणाले. तसेच हरिभाऊ बागडेंबद्दल जे बोलण्यात आलं, ते कामकाजातून काढून टाका. अशा प्रकरे बोलणं योग्य नाही. मग तुमच्यात आणि यांच्यात फरक काय आहे? असा सवाल त्यांनी केला.
Video : ‘म्याव-म्याव; प्रकरणाचे सभागृहात पडसाद, सेनेकडून नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी#shivsena #niteshrane #aadityathackeray pic.twitter.com/878qMUCiHg
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2021
संबंधित बातम्या:
तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, विधानसभेत पुन्हा गदारोळ, जाधवांचे भाजपला खडे सवाल