मुंबई : शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटावर सरकारने कुठलीही मदत तर केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीनं वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे, असा आरोप भाजपा नेते गोपीचंद पडळकर (BJP Leader Gopichand Padalkar) यांनी केला आहे.
‘मुख्यमंत्री वर्षाच्या बाहेर पडायला तयार नाहीत’
महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)वर टीका करताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) वर्षाच्या बाहेर पडायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाभकास आघाडीनं घेतला आहे. पडळकर यांनी वीजतोडणीवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘अनेक त्रुटी व अनियमीतता’
दोन-दोन, चार-चार वर्षामागील वीजबीलं, पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देणं यात अनेक त्रुटी व अनियमीतता आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यांनीशी वीजबीला(Electricity Bill)संदर्भातील भोंगळ कारभार उघडा पाडला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे’
ते म्हणाले, की मी समस्त शेतकरी भावांना आवाहन करतो, की ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे, आपापल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे ते सूपूर्द करून पोचपावती घ्यावी. दरम्यान, राज्यभरात वीजतोडणीच्या विरोधात आंदोलन तापणार असे दिसत आहे. पडळकरांनी एसटी(ST Employees Strike)नंतर आता आपला मोर्चा वीजतोडणीच्या विरोधातल्या आंदोलनकडे वळवलाय.