भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का

| Updated on: Oct 03, 2024 | 3:29 PM

Harshvardhan Patil: मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकीता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्ह ओक या निवासस्थानी त्यांची ही भेट झाली. त्यात पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का
BJP
Follow us on

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची चिन्ह आहेत. भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहे. भाजपचे इंदपूरमधील माजी आमदार हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी देखील तुतारीचे स्टेटस ठेवले आहे. दुसरीकडे मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकीता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्ह ओक या निवासस्थानी त्यांची ही भेट झाली. त्यात पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचे स्टेटस ठेवले आहेत. यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत आता मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनीही पितृपक्षानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करु, असे म्हटले होते. त्यानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीच हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या अंकीता पाटील यांच्यासह शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी पोहचले. त्या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. या चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

शरद पवार इंदापूरमध्ये मेळावा घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार सात तारखेला इंदापूरमध्ये मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत दाखल होणार की काय? हे येत्या एक, दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. परंतु इंदापूरमधून शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील असणार आहे, असे म्हटले जात आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दहा वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद ठेवली आहे. त्यात ते आपली भूमिका जाहीर करणार आहे.

हे सुद्धा वाचा

भिगवण येथे लागले पोस्टर

हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थक शेतकऱ्यांनी भिगवण येथे हर्षवर्धन पाटील 2024 फिक्स आमदार… तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाचे पोस्टर रेखाटले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढली जाते. सध्या इंदापुरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात तापले आहे. त्यातच इंदापुर तालुक्यातील भिगवणच्या हर्षवर्धन पाटील प्रेमी शाहरुख शेख आणि सलमान शेख या शेतकऱ्यांनी बैलपोळ्याच्या निमित्त हर्षवर्धन पाटील 2024 फिक्स आमदार, तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाचे पोस्टर लावले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.