‘छोट्या ठाकरेंनी डील केलं, दुबईत हॉटेल घ्यायचंय, अदानींकडून 10,00,00,00,000/- वसूली करायचीय’, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

| Updated on: Dec 16, 2023 | 9:52 PM

उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन सत्ताधारी भाजप आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात मोर्चा पुकारला आहे. ठाकरेंनी आज अदानी उद्योग समूहाच्या विरोधात धारावी ते बीकेसी असा पायी मोर्चाही काढला. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

छोट्या ठाकरेंनी डील केलं, दुबईत हॉटेल घ्यायचंय, अदानींकडून 10,00,00,00,000/- वसूली करायचीय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप
Follow us on

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धारावीतून भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरेंनी धारावी ते अदानी उद्योग समूहाचं कार्यालय असलेल्या बीकेसीपर्यंत भव्य मोर्चा काढला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह भाजपवर खोचक शब्दांत टीका केली. त्यांच्या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे अदानींकडून पैसे मिळाले की, आपल्या भूमिकेशी यु टर्न घेतील, अशी टीका केली. त्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

“धारावी विकास, आता धारावीच्या नावाने अदानीकडून पैसे वसूलीची तयारी सुरु आहे. 10000000000/- (10 अब्ज रुपयांची) वसूली करायची आहे. उद्धव यांना दुबईत हॉटेल खरेदी करायचं आहे, ज्याचं डील काही दिवसांपूर्वी छोटे ठाकरेंनी केली आहे”, असा धक्कादायक दावा मोहित कंबोज यांनी ट्विटवर केला आहे.

धारावीचा पुनर्विकास नेमका किती कोटींचा आहे?

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सरकारने विविध कंपन्यांसमोर लिलाव केला होता. यावेळी अदानी उद्योग समूहाने सर्वाधिक 5069 कोटींची बोली लावून हा प्रकल्प मिळवला होता. 5069 कोटी म्हणजे 50 अब्ज 69 कोटी रुपये. इतक्या कोटीं रुपयांची बोली या प्रकल्पासाठी लावण्यात आली आहे. या प्रकल्पावरुन सातत्याने वेगवेगळी चर्चा समोर येत असते. असं असताना आता मोहित कंबोज यांनी “उद्धव ठाकरे यांना अदानी यांच्याकडून 10 अब्ज रुपये वसूल करायचे आहेत”, असा थेट आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?

“गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प चर्चेत आहे. अनेक नेते इथे आहेत. अनेक जण या प्रश्नासाठी आवाज उठवत आहे. मी त्यांना वचन दिलं होतं की, फक्त मुंबईच काय, संपूर्ण महाराष्ट्र आज धारावीत उतरवेल. त्याप्रमाणे फक्त मुंबईतली आपले कार्यकर्ते आज रस्त्यावर आलो आहेत. याचं वर्णन करण्याची गरज नाही. मी माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी हे दृश्य अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा. ज्याने ज्याने अदानींची सुपारी घेतली आहे त्या सुपारीबाजांना सांगू इच्छितो हा अडकित्ता लक्षात घ्या. किती मोठा अडकित्ता आहे. खलबत्ता आहे, अडकित्ता आहे, तुमची दलाली अशी ठेचून टाकू की, दलालीचं नाव घेणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“सरकारचा मध्ये कार्यक्रम चालला होता की, सरकार आपल्या दारी. पण हे सरकार अदानींच्या दारी आहे. आम्ही उतरलो आहोत, धारावीतील सगळ्यांचा एफएसआय, टीडीआर अदानींना देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीय. ढगांची गरजच नाही. बिन ढगांच्या सवलींता एवढा पाऊस पाडलाय की, आणखी ढगांची गरजच नाही. देवेंद्र आणि कंपनी म्हणतेय म्हणजे… संजय राऊत यांनी म्हटलंय भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडत आहेत की, उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानींचे बूट चाटत आहात ते कशासाठी चाटत आहात?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.