मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत सरकारला घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केल्याचं बघायला मिळालं. या सगळ्या घडामोडींनंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी भास्कर जाधव यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला. तसेच त्यांनी 22 जूनला एकनाथ शिंदे यांना बंडखोर आमदारांमध्ये सामील करुन घेण्याची विनंती केली, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.
गेल्या वर्षी शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह वेगळा गट निर्माण केलेला. त्यावेळेस याच भास्कर जाधव यांनी शिंदे गटामध्ये सामील होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलेलं होतं.पण भास्कर जाधवांवर विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना या आमदारांच्या गटात घेतलं नाही. त्यावेळेस हेच भास्कर जाधव आणि आमदार सुनील राऊत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काय बोलत होते? हे भास्कर जाधव खोटं ठरवू शकतात का? भास्कर जाधव यांनी तर गुवाहाटीची तिकीट सुद्धा बुक केली होती.
खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे !@_BhaskarJadhav की सचाई ! pic.twitter.com/rraB413XC2
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) February 27, 2023
दरम्यान, विधानसभेत आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्यावर चर्चा असताना भाजप आणि मविआ आमने-सामने आले. भास्कर जाधव यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव धमकी देत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावेळी भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही, असा आरोप करत काय चाललंय असा प्रश्नही केला. यावर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.