मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर भाजपच्या गोटात लगेच हालचालींना वेग आल्याची शक्यता आहे. कारण भाजप नेते मोहित कंबोज यांनी नाव न घेता संजय राऊतांना सूचक इशारा दिला आहे. मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी आपल्याला पुन्हा मैदानात उतरावं लागेल, अशाप्रकारचं सूचक विधान केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत आज संध्याकाळी उशिरा जेलमधून बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर जमले होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात संजय राऊतांचं स्वागत केलं.
संजय राऊत जवळपास 102 दिवसांनी जेलमधून बाहेर आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात तितकाच उत्साह होता. यावेळी त्यांनी कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलंय तेच आपण सांगत होतं, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आपण झुकणार नाही म्हणालो होतो. त्यामुळे शंभर दिवस तुरुंगात होतो, असंदेखील ते म्हणाले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोष केला.
संजय राऊत जेलमधून बाहेर पडल्यानंतर सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन करणार आहेत. त्यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा ते आपल्या घरी पोहोचतील.
पण संजय राऊत घरी पोहोचण्याआधीच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केलंय. हे ट्विट त्यांनी हिंदीत केलंय. “लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा…”, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा ….
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) November 9, 2022
मुंबई हायकोर्टात उद्या सुनावणी
संजय राऊत यांनी विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन दिलाय. पण त्यांच्या जामीनाच्या निकालास ईडीच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय. ईडीने आधी राऊतांच्या जामीन स्थगित करावा, अशी विनंती हायकोर्टाकडे केली होती. पण हायकोर्टाने ती मागणी फेटाळली.
ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाच्या निकालावर आव्हान देणारा अर्ज दाखल केलाय. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. पण हायकोर्टाने वेळेचं कारण सांगत आज सुनावणी घेतली नाही.
हायकोर्टाने उद्या सुनावणी होईल, असं म्हटलंय. त्यामुळे मुंबई हायकोर्टात उद्या होणाऱ्या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष आहे.