विजय गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 13 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मोठं मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. पण मंदिराचं पूर्ण बांधकाम अद्याप झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे हिंदू धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरु शंकाराचार्य यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही, असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनादेखील चांगलंच फटकारलं आहे. मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये भूत, प्रेत सामावण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. शकराचार्यांनीदेखील याबाबत भाष्य केलं. पण एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राजकीय नेत्यांना फटकारलं. त्यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी शंकराचाऱ्यांवर टीका केली.
“शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं”, असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांना दिलं आहे. राम मंदिर पूर्णपणे बनण्याआधीच प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत असल्याने शंकाराचार्यांनी उद्घाटन सोहळ्यावर आक्षेप घेतला आहे. त्यावर उत्तर देताना नारायण राणे यांनी संबंधित वक्तव्य केलं आहे.
“शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? म्हणजे शंकराचार्य आमच्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नाहीय तर धार्मिकतेने होत आहे. राम आमचं दैवत आहेत. त्यासाठीच हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यातील हिंदू धर्मासाठी असलेले योगदान सांगावं. जे रामांनी हिंदू धर्माला योगदान दिलं तसं शंकराचार्यांनी सांगावं”, असं नारायण राणे म्हणाले.
“राजकारण्यांची एक सीमा असते. त्यांच्यावर काही बंधनं असतात. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात विधीचं पालन विधिवत व्हायला हवं. प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप केल्यास तो राजनेत्याचा उन्माद मानला जातो”, असं शंकराचार्य एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. दरम्यान, काँग्रेसनेदेखील राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.