मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या रोखठोक कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला निर्णय घ्यावा लागले, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. या सर्व घडामोडींवर पंकजा यांनी रोखठोक भूमिका मांडली. “ईश्वर न करो आपल्यावर निर्णय घेण्याची वेळ येवो”, असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
“माझ्याविषयी कुणीही अफवा उठवू नका. मला जेव्हा आयुष्यातही काहीही निर्णय असेल, असा निर्णय आयुष्यात घेण्याची वेळ कधीही येऊ नये. कारण जसं एक विवाहबंधन असतो तसं संघटनेशी आपलं एक बंधन असतं. आपण नकळत एकमेकांना वचन, आणाबाका, शपथा दिलेल्या असतात. आपण एका विचारधारेवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय कोणत्याही व्यक्तीला घ्यावा लागेल तर तो निर्णय खूप त्रासदायक असतो”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“माझ्यासाठी तो निर्णय प्रचंड त्रासदायक असेल. कारण मी या संघटनेत माझ्या वडिलांना बघितलेलं आहे. माझ्यासाठी ती एक वेग अटेचमेंट आहे. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय घेण्याची वेळ कुणावर येऊच नये, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी म्हटलेलं आहे, पंकजा मुंडे निर्णय घेईल तर ती स्वत: तुम्हाला बोलवून सांगेन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी पंकजा मुंडे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. आपण आपलं म्हणणं अमित शाह यांच्याकडे मांडू, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. याबाबत त्यांना विचारला असता अमित शाह यांनी आपल्याला वेळ दिला नाही, असं अमित शाह यांनी सांगितलं.
“अजून तरी मला त्यांची वेळ मिळालेली नाही. ते मध्यंतरी लोकसभेच्या अधिवेशनात व्यस्त होते. त्यांची वेळ का नाही मिळाली? याचं उत्तर मी देऊ शकत नाही. त्यांची वेळ अजून मिळाली नाही. ते आता निवडणुकीत व्यस्थ असतील. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी सांगेन”, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.