विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार सुरु असतात. पंकजा मुंडे यांनी याआधी अनेकदा आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पराभव झाला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे यांचं नाव वारंवार चर्चेत येत असतं. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सातत्याने पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येत असतं. भाजपकडून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईला का? अशी चर्चा वारंवार समोर येत असते. पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना वंजारा समाजाचा मोठा पाठिंबा आहे. याशिवाय त्या माजी महिला आणि बालविकास मंत्री देखील होत्या. त्यामुळे पंकजा यांना विधान परिषदेत किंवा राज्यसभेत संधी दिली जाऊ शकते, अशी सातत्याने चर्चा होत राहते. पण तसं फार होताना दिसत नाही. पण यावेळी काहीशा वेगळ्या घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे यांचं नावही चर्चेत आहे. कदाचित त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संधी दिली जाऊ शकते. पंकजा मुंडे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून नरमाईची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मध्यंतरी पंकजा या वेगळा निर्णय घेतात की काय? अशी चर्चा सुरु होती. पण पंकजा मुंडे यांनी आपण भाजप पक्षातच राहणार असा निर्णय घेतला होता. पंकजा मुंडे या भाजपचं केंद्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे कदाचित यावेळी पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी ही भेट घडून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा मुंडे या काल रात्री (6 फेब्रुवारी) देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. यावेळी या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. पंकजा मुंडे या केंद्रात भाजपच्या पक्ष संघटनेचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. भाजपकडून सर्व उमेदवारांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. त्यातूनच पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या राज्यसभेच्या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता भाजप तीन जागांवर सहज विजयी होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट प्रत्येकी एक जागावर निवडून येऊ शकतात. तर सहाव्या जागेसाठी चुरस असण्याची शक्यात आहे. या जागेवर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार उभा राहिला तरी केवळ 30 मतं पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 12 ते 15 मतं कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवर बिनविरोध निवडणूक होईल, अशी चर्चा होती. पण आता भाजप त्या जागेवर उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची नुकतीच बैठकही पार पडली होती. त्यामुळे याबाबतच्या आगामी काळातल्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत.