मुंबई: मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काढलं आहे. आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच मला वाटतंय, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर पंकजा यांचं हे विधान आल्याने त्याची चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हे विधान केलं. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. त्यामुळे सत्तेत नसताना तुम्ही दु:खी आहात का? माझ्या हातात असते तर मी तात्काळ मदत केली असती असं तुम्ही म्हणाला होता? याकडे पंकजा मुंडे यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी हे विधान केलं. सत्तेत नाही याचं दुख नाही. सत्तेत जनता असली पाहिजे. सत्तेच्या खूर्चीवर कोण व्यक्ती आहे याला महत्त्व नाही. त्याची प्रवृत्ती काय याला महत्त्व आहे. मी कोणत्या मंत्रीपदावर नाही याचं मला दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही. मी या पदावर नाही… त्या पदावर नाही… पण माझ्या हातात असतं तर मी केलं असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी ज्या काही मागण्या सरकारकडे करते त्या माझ्या अनुभवावरूनच करते. माझी प्रत्येक मागणी ही प्रॅक्टिकलच असते. केवळ भाषण करायचं, जातीपातीत भिंती पाडायच्या यासाठी मी कधीच काही मागत नाही. जे मी स्वत: निभावू शकते, त्याच गोष्टी मी करते. मी माझे वडील गोपीनाथ मुंडे यांना नेहमी एक प्रश्न विचारायचे. बाबा, आपण ज्या घोषणा करतो त्या पूर्ण करू शकतो का? असं मी मुंडे साहेबांना नेहमी विचारायचे. त्यावर राजकारणात लोकांना काय हवं तेही बोलावं लागतं असं ते म्हणायचे. पण आपण करू शकतो का? असं मी म्हणायचे. त्यावर तू अशी बोलतेय जशी काय जन्मताच मंत्री होऊन आली असं ते म्हणायचे. मंत्री झाल्यावर जेव्हा मी काम केलं तेव्हा त्या सर्व गोष्टी आठवणीत ठेवून काम केलं. आज मी विरोधी पक्षात आहे. ज्या गोष्टी मंत्रिपदात राहून करणं शक्य आहेत अशाच गोष्टी मी मागत असते. माझ्या या मागण्या सर्व प्रॅक्टिकल आहेत, असं त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात जे राजकीय चित्रं दिसतं ते फार उत्साहवर्धक नाही. जनता आज त्रस्त आहे. जेवढा सक्षम सरकारचा पक्ष असतो तेवढा सक्षम विरोधी पक्ष असेल तर जनता सुखी राहते. आज तिन्ही पक्षावर जोरात काम करण्याची जबाबदारी आहे.
काम न करणाऱ्यांना घरी बसवा असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यावरूनही त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. या विधानामागे माझा रोख कुणाकडेच नव्हता. जे लोक सत्ताधारी आहेत. प्रशासन आणि सत्तेवर ज्यांचं राज्य आहे त्यांच्यापुरताच हा रोख होता. जेव्हा आपण काही मागत असतो तेव्हा नेमकं कुणाला मागतो तर जे निर्णय प्रक्रियेत आहेत त्यांना मागतो. केवळ बीडमध्ये नाही तर राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अत्याचाराची दाहकता भीषण आहे. त्यामुळे माझा रोख हा वैयक्तिक कुणावर नाही. ज्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या आहेत त्यांच्यावर आहे, असं त्या म्हणाल्या.
केंद्राकडून किती निधी आणला असा सवाल सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी विचारण्याच्या भूमिकेत आहे. जेव्हा उत्तर द्यायच्या भूमिकेत होते तेव्हा उत्तर दिली आहेत. जेव्हा उत्तर द्यायच्या भूमिकेत येईल तेव्हा उत्तर देईल, असं त्या म्हणाल्या.
तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या धाडींवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी आरोपांकडे न्यूट्रली पाहते. ज्यांच्याबाबत घटना घडते त्यांना वाटते त्यांच्यावर अन्याय होतो. ज्यांच्यावर घडत नाही तेव्हा लोकांना वाटतं जनतेवर अन्याय होतो. या सर्व गोष्टी आहेत त्या देशाला मजबूत करणाऱ्या आहेत. कायद्याने आवश्यक असलेल्या ठिकाणी वसुली करणं, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने व्यवसाय केला जातो अशा लोकांवर अंकूश असलाच पाहिजे. चुकीचं काही होत असेल तर चौकशी झालीच पाहिजे. त्यात काही गैर नाही. कुणाला उत्तर देण्याची क्षमता असेल तर ते बाहेर पडतील, असं त्या म्हणाल्या.
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असेल असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. हे जनताच सांगेल. या प्रश्नाची व्याप्ती मोठी आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांनी चांगले निर्णय घेतले तर तेही त्याचा भाग होऊ शकतात. त्यांना शुभेच्छा देते. जो व्यक्ती जनतेच्या हिताचा निर्णय घेईल जनता त्याला मनात स्थान देईल, असंही त्या म्हणाल्या.
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 14 October 2021 https://t.co/AivafddpNC #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021
संबंधित बातम्या:
जावयाकडे गांजा सापडलाच नाही, गांजा आणि तंबाखूमधील एनसीबीला फरक कळतो की नाही?; नवाब मलिक यांचा सवाल
(bjp leader pankaja munde reaction on various issues in maharashtra)