Pankaja Munde | धनंजय मुंडे युतीचे मंत्री, परळी मतदारसंघात निवडणूक कोण लढवणार? पंकजा मुंडे म्हणाल्या….

| Updated on: Sep 26, 2023 | 6:09 PM

पंकजा मुंडे यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. त्यांच्या साखर कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आलीय. पण ती नोटीस नसून कारवाई असल्याचं पंकजा स्पष्ट म्हणाल्या.

Pankaja Munde | धनंजय मुंडे युतीचे मंत्री, परळी मतदारसंघात निवडणूक कोण लढवणार? पंकजा मुंडे म्हणाल्या....
Follow us on

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘रोखठोक’ कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी पंकजा मुंडे यांनी सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी विभागाने नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये कारखान्याचा 19 कोटींची कर चुकवला नसल्याची माहिती समोर आलीय. जीएसटी विभागाची ही नोटीस नसून कारवाई आहे, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं. तसेच ही कारवाई आठ दिवसांपूर्वी झाली असताना कुणीतरी मुद्दामून काल ती बातमी समोर आणली, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे यांनी यावेळी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीतला पराभव झाला याचा अर्थ आपण पुन्हा निवडून येणार नाहीत, असं होणार नाही. देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचादेखील पराभव झाला होता. पण त्या पुन्हा निवडून आल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा निवडून येणार, असं त्या म्हणाल्या. याशिवाय अनेक भाजप उमेदवारांचं निवडणुकीत पराभवानंतर राजकीय पुनर्वसन झालं. त्याप्रमाणे आपल्यालाही संधी मिळायला हवी होती, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.

‘माझ्यामध्ये खूप संयम’

“सहन करणं असा काही विषय नाही. पण लोकं सारखे म्हणतात की तुम्ही संघर्ष कन्या आहात. तुम्ही किती सहन करणार? आता समोरचा माणूस प्रश्न विचारतोय. मी स्वत:हून तर म्हटली नाही की, मी खूप सहन करतेय. पण समोरचा माणूस प्रश्न विचारतो तेव्हा मी त्याला हसून उत्तर दिलं की, मी संघर्ष करण्याबरोबर सहनशील कन्या देखील आहे. सहनशीलता हवी. जीवनात सहनशीलता हवी. माझ्यामध्ये खूप संयम आणि सहनशीलता आहे”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

‘मला अजून कोण बोललं नाही की माझं भविष्य काय?’

“अजित पवार भाजप बरोबर यावेत हा निर्णय कुणी घेतला? तेच भविष्यात हा निर्णय घेतील. हा निर्णय मी आणि धनंजय घेणार कसे? धनंजय यांच्या डोक्यावर त्यांचे नेते आहेत. माझ्या डोक्यावर माझे नेते आहेत. वरिष्ठांनी काय विचार केला ते मला माहिती नाही. धनंजय यांना काही बोलले असतील ते मला माहिती नाही. पण मला अजून कोण बोललं नाही की माझं भविष्य काय?”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“आधी तर पंकजा मुंडे पराभूत झाल्या असं बोललं जात होतं. पण या देशात तर इंदिरा गांधी या सुद्धा पराभूत झाल्या होत्या. पण त्या परत सत्तेत आल्या होत्या. पराभूत झाल्या म्हणजे संपल्या असं होत नाही. तुम्ही माझे मतं पाहिली तर तेवढीच मते पडली. पण तिसरा वर्ग होता, त्या वर्गाचे मते मिळाली नाहीत”, असं पंकजा म्हणाल्या.

“मी जे काही बोलते ते बोलत नाही, ते माझं उत्तर असतं. मला एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार का? तेव्हा मी सांगितलं की मला 25 मतदारसंघाची ऑफर आहे. मी अनेक आमदारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक सभा माझ्या झाल्या. त्यामुळे काही आमदार मला म्हणाले की, पंकजा ताई तुम्ही आमच्या मतदारसंघातून निवडणूक लढवा”, असं स्पष्टीकरण पंकजा यांनी यावेळी दिलं.

‘इश्वर न करो, माझ्यावर ही वेळ येवो’

“माझं सध्या फोकस फक्त त्या लोकांकडे आहे जे माझ्याकडे आशेने बघतात. माझा जिथे प्रभाव आहे, जिथे शक्ती आहे तिथे फोकस आहे. माझा फोकस हा विधानसभा आणि लोकसभेवर नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी यावेळी आपण पक्षातून बाहेर जाणार नाही, असं सांगितलं. आपल्या वडिलांनी भाजप पक्ष उभा केलाय. त्यामुळे आपल्यावर इश्वराने आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आणू नये, असं पंकजा म्हणाल्या.

परळी विधानसभा निवडणूक कोण लढवणार?

यावेळी पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा निवडणूक कोण लढवणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “परळीचं काय? धनंजय मंत्री झाले. मी मंत्री झाले तेव्हाचा संघर्ष तुम्ही पाहिला. माझ्यावर सर्वात जास्त आरोप झाले, तो एक मुद्दा आहे. पण आता धनंजय मुंडे मंत्री झाले तेव्हा मी त्यांना ओवाळलं हे जगाने पाहिलं. कुणाला कुठलं पद मिळालं, याचं मला काहीही वाईट वाटत नाही”, असं उत्तर दिलं.

“धनंजय आणि मी बसून हा विषय ठरणार नाही. ज्यांनी हे सरकार आणलं त्यांनी हे विषय ठरवायचे आहेत. ते आमच्या जेव्हा या विषयावर चर्चा करतील तेव्हा मार्ग निघेल. आम्ही दोघेही हा निर्णय घेऊच शकत नाही”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.