भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार पीयूष गोयल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी पीयूष गोयल यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कमी जाणवली का? असा प्रश्न पीयूष गोयल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “मला वाटत नाही. कारण सरकार चांगल्याप्रकारे काम करतंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वभाव मी पाहिला. त्यांच्यासोबत आलेले सहकारी, त्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासासोबत जोडलं होतं. जे प्रकल्प अनेक दिवसांपासून रखडले होते त्यांना पुन्हा वेगवान गती दिली आहे. ते चांगलं काम करत आहेत. आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते या सरकारपासून समाधानी आहोत”, अशी प्रतिक्रिया पीयूष गोयल यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शिंदे गट आणि अजित पवार गटांच्या उमेदवारांची अद्याप पूर्ण यादी आलेली नाही. याबाबत काय सांगाल? असा प्रश्न पीयूष गोयल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उमेदवारांची यादी जवळपास निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिली. “आधीच्या काळात तर निवडणुकीच्या दोन दिवस आधी किंवा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी उमेदवारांची नावे जाहीर केली जायचे. आता तर निवडणूक जाहीर होण्याआधी आम्ही उमेदवार जाहीर केले आहेत. चांगली साधकबाधक चर्चा सुरु आहे. आम्ही सर्वाधिक जागांवर जिंकून येऊ. देशात आम्ही 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागांवर जिंकू”, अशी प्रतिक्रिया पीयूष गोयल यांनी दिली.
“विरोधी पक्षाकडे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते अशाप्रकारचे अफवा सुरु करतात. आमचा एक संकल्प आहे की, भारताला विकिसत बनवायचं. त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करु. संविधानात बदल करण्याची काही शक्यता वाटत नाही. देशाला विकासित करायचं आहे. प्रत्येकाला तरुण-तरुणीला योग्य संधी मिळावी, नारीचा सन्मान व्हावा, भारत गरिबीमुक्त होवो आणि भ्रष्टाचारमुक्त होवो. देशात आगामी काळात विकासाची धारा वाहणार. भारतीयांच्या उज्ज्वल भविष्याची पंतप्रधान मोदींची गॅरंटी आहे”, असं पीयूष गोयल म्हणाले.
“मोदींनी जे सांगितलं ते केलं. त्यांच्यावर आज अतूट विश्वास आहे. मोदींनी देशाला एका धागेत बांधलं आहे. गरिबांना लाभ मिळालं. केंद्रात भ्रष्टाचारमुक्त सरकार राहील. त्यामुळे देशाला विकसित करण्याची ही गॅरंटी आहे. समाजाला प्रत्येत व्यक्तीला आपलं योग्य स्थान मिळावं, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, युवाशक्तीचा पगार वाढावा याचा विडा मोदींनी उचलला आहे”, असं पीयूष गोयल यांनी सांगितलं.