मुंबई | 26 फेब्रुवाराी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता सत्ताधारी आमदारांकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. “मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरोप करत आहेत ते चुकीचं आहे. आम्ही फडणवीस यांचा एकेरी उल्लेख सहन करू शकत नाही. यापुढे त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल”, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिला. “जरांगे पाटील हे राज्यातील राजकारणातले नवे नटसम्राट झालेले आहेत. रोज उठतात आपली भूमिका बदलतात. रोज आजारीपणाचं नाटक करतात. मला असं झालं. मला तसं झालं. मुंबईच्या दिशेने निघतात. पुन्हा युटर्न घेतात आणि अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतात. हे साफ चुकीचं आहे. समाज याला खपवून घेणार नाही”, असं प्रसाद लाड म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस हे एकटेच ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रात कायम मराठा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ही सल कुठेतरी मराठा समाजातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोचते. त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान केले जातात”, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. “जरांगे पाटील हे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार राजेश टोपे यांची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. त्यांचे जे मुद्दे असतात तेच मुद्दे जरांगे पाटील यांचे देखील असतात. त्यामुळे यामागे आमचा थेट आरोप शरद पवार यांची ते तुतारी वाजवत आहेत, असा आहे”, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला.
शिवसेना नेते भरत गोगावले यांनीदेखील मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “मनोज जरांगे पाटील यांना आम्हाला एवढेच सांगायचं आहे की त्यांनी आता तरी थांबावं. आता दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलंय. आम्ही देखील मराठा आहोत. हे आरक्षण पुढे कोर्टात कायदेशीर लढा कसा देता येईल याबद्दल त्यांनी सरकार समोर बसून चर्चा करायला हवी. पण रोज उठसूठ उठायचं, आंदोलन करायचं, उपोषण करायचं, सरकारला अपशब्द बोलायचं हे खपवून घेतलं जाणार नाही. हे साफ चुकीचं आहे”, अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली.
विरोधी पक्षाचे नेते जे काय बोलतात ते हास्यास्पद आहे. सरकारमधले नेते त्यांचे जीव घेण्याचा प्रयत्न करतील का? ते मराठा समाजासाठी लढत आहेत. ते मराठ्यांचे नेते आहेत.पण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. ते साफ चुकीचं आहे, असं भरत गोगावले म्हणाले. “काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे काय बोलतात त्यांना देखील माहित नाही. बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांमध्ये काही दम नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देणे योग्य देखील ठरणार नाही”, असं भरत गोगावले म्हणाले.