मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठीच आपण पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेचं आता भाजपकडून स्वागत करण्यात येत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्हिडीओ जारी करत भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांचं मनापासून महायुतीत स्वागत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच महायुतीच्या शिलेदाराला बाळासाहेबांचा खरा वारसादर मिळाला, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
“राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी महायुतीत आता मनसे एकत्र येणार आहे. महायुतीचा समन्वय म्हणून मी राज ठाकरे यांचं महायुतीत स्वागत करतो. महायुतीला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिलेदारांचा आशीर्वाद मिळालाच होता. पण आता राज ठाकरेंच्या रुपाने बाळासाहेबांचा खरा वारसदारही मिळाला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून महायुतीला बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदाराचा आशीर्वाद मिळेल आणि महायुती भक्कम होईल, याची मला खात्री आहे”, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली.
“राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्याचं निश्चितच स्वागत आहे. कारण शेवटी जागांपेक्षा काही मिळतं यापेक्षा माझा देश महत्त्वाचा आहे, तरुण पिढीचं भविष्य महत्त्वाचं आहे, महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्त्वाचा आहे, अशा व्यापक विचारातून राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय हा भाजपच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस असेल, महाराष्ट्रातील जनता असेल, राज ठाकरेंच्या या निर्णयाने त्यांना निश्चितच आनंद आणि समाधान मिळणार आहे. कारण राज ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यांच्या वक्तृत्वाची भुरड जनमाणसांना पडते. त्यामुळे मोदींना महाराष्ट्रातून जे समर्थन मिळणार आहे त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले.
“एका बाजूला उद्धव ठाकरे जे सत्तेमुळे लाचार होऊन त्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला. मराठी माणसाचा विचार सोडला आणि काँग्रेसच्या बाजूला जाऊन बसले. दुसरीकडे जागावाटप महत्त्वाची नाही, राज्यसभा, विधान परिषद महत्त्वाची नाही. तडजोडीपेक्षा देश महत्त्वाचा आहे, अशा प्रकारचा व्यापक विचार करणारा नेता, त्याचं मोठपण त्यांच्या समर्थनातून दिसून आलं”, अशी भूमिका प्रविण दरेकर यांनी मांडली.