केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल पुण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत, अशी टीका शाह यांनी केली. तसेच त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही शरद पवारांवर टीका केली. त्यांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली. अमित शाह यांनी शरद पवारांवर अशी टीका करायला नको होती. ते आमचे दैवत आहेत, असं अण्णा बनसोडे म्हणाले आहेत. बनसोडे यांच्या या भूमिकेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना सुनावलं आहे. ‘अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांची चिंता करावी’, असं प्रवीण दरेकर यांनी सुनावलं.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आले आहेत. अण्णा बनसोडे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची साथ सोडलेली आहे. असं असताना त्यांना शरद पवार यांच्या विषयी इतकी कळवळ असण्यामागचं नेमकं कारण काय? हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. त्यासोबतच जर इतकी कळवळ होती तर मग ते अजित पवारांसोबत का आले? हा देखील आमचा त्यांना प्रश्न आहे”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.
“अण्णा बनसोडे यांची शरद पवारांसोबत असलेली निष्ठा आम्ही समजू शकतो. केंद्रीय मंत्री अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि मोठे नेते म्हणजे काय? त्यांच्या पुढाकाराने केंद्रात सरकार आलं. अमित शाहांचा यात मोठा रोल आहे आणि अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांची चिंता करावी”, असं प्रवीण दरेकरांनी सुनावलं.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटात जातील, अशा बऱ्याच चर्चा आहेत. पण पैकीच्या पैकी आमदारांनी विधान परिषदेमध्ये मतदान केलं आणि चार-पाच इतर पक्षाची मत सुद्धा वाढीव मिळाली. त्यामुळे या सगळ्या चर्चांना विराम बसलेला आहे आणि आता अजित दादा हे महायुतीतच राहतील. एकही आमदार फुटणार नाही. इकडे तिकडे जाणार नाहीत”, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.
प्रवीण दरेकर यांनी यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. “जरांगे पाटील यांचे गोलच भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असं समजतंय. त्यांचा फोकस नेमका कोण आहे? मराठा समाजाचे प्रश्न आहेत की फोकस हे राजकारण आहे? हे जरांगे पाटील यांनी स्पष्ट करावं. अंतरवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली बसून कुठल्या मतदारसंघाचा दौरा करायचा? कुणाला पाडायचं? कुणाला जिंकवायचं? या राजकीय काथ्याकूट करण्यात वेळ घालवणार असाल तर मग तुमचा फोकस राजकारणाकडे वळतोय हेच आम्ही जरांगेंना सांगितले”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
“आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत ज्या शिवराळ भाषेचा वापर जरांगे यांनी केला ते महाराष्ट्रात कोणालाही आवडलं नाही. आरक्षणाचा प्रश्न सकारात्मक आहे. पण कोणी काय बोललं तर त्यावर टीका करायचं हे चुकीचं आहे. जरांगे यांनी संयमी असायला पाहिजे”, असं दरेकर म्हणाले.