इतिहासाची पुनरावृत्ती होणार? भाजप राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत

| Updated on: Feb 05, 2024 | 9:49 PM

राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी आता भाजपकडून रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. मतांचं गणित पाहता भाजप या निवडणुकीत तीन जागांवर सहज निवडून येऊ शकणार आहे. पण आता भाजप सहाव्या जागेसाठी देखील प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती होणार? भाजप राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी राज्यसभा निवडणुकीत जो पराक्रम भाजपने करुन दाखवला अगदी तसाच पराक्रम भाजप करुन दाखवण्याचा तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतांचा कोटा कमी असतानादेखील भाजपने आपला उमेदवार राज्यसभा निवडणुकीत निवडून आणला होता. भाजप आतादेखील तशाच तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक पार पडली. महायुती राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व 6 जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यासाठी या बैठकीत खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यात सत्तांतर घडून आल्यामुळे राज्यसभा निवडणुकीचं गणितही बदललं आहे. सध्याचं आकडेवारीचं गणित पाहता या निवडणुकीत भाजपचे उमेदवार तीन जागांवर निवडून येऊ शकतात. तर एका जागेवर काँग्रेस आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रसेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट जिंकू शकतो. तर सहाव्या जागेसाठी सर्वांना मतं कमी पडण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या उर्वरित मतांचा विचार केला तरी सहाव्या जागेसाठी मते कमी पडू शकतात. त्यामुळे सहाव्या जागेची निवडणूक ही बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. पण आता भाजपने या सहाव्या जागेसाठी देखील तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.

पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप आमदार आशिष शेलार आणि कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. भाजपने याआधीदेखील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका दिला होता. कोटा नसताना आपले उमेदवार जिंकून आणण्याचा वेगळा पराक्रम भाजने केला होता. आता पुन्हा राज्यसभेच्या या जागा पाहिल्या तर तीन जांगांवर भाजप उमेदवार देऊ शकतं. तर एक जागा शिंदे गट, एक जागा अजित पवार गटाला दिलं जाऊ शकतं. तर एक जागा काँग्रेससुद्धा लढणार आहे. या सहाव्या जागेच्या विरुद्ध उमेदवार द्यायचा की नाही, याची चाचपणी भाजपची कोअर कमिटी करणार आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत याबाबतची खलबतं झाली. त्यानंतर आता फायनल यादी दिल्लीला वरिष्ठांकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर वरिष्ठ सर्व नावे एक-दोन दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीचं नेमकं गणित काय?

राज्यसभेची निवडणूक कशी होते हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असतं. राज्यसभेत सध्या सक्रिय आमदारांची संख्या ही 286 आहे. तर राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक आहे. त्यामुळे 286 भागिले 6 अधिक 1 असं गणित केलं तर 40.9 असं उत्तर येतं. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी उमेदवारांना किमान 41 चा आकडा गाठणं गरजेचं असणार आहे. सध्याचं पक्षीय बलाबल पाहता भाजपचे तीन खासदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी एक खासदार निवडून आणू शकतात. ठाकरे गटाने ताकद लावली तर कदाचित त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो. पण ते खूप कठीण असणार आहे.