मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे भाजप आणि शिंदे आक्रमक झाला. शिंदे गट आणि भाजपकडून राज्यभरात अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत संभाजी महाराज यांना संभाजी रक्षक की धर्मवीर म्हणावं यावरुन वाद नको, असं स्पष्ट केलं. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याला खोडत तसा वाद होऊ शकत नये, असं स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपने अजित पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
“अजित पवारांच्या ‘धर्मवीर’ विषयावर शरद पवारांनी असहमती दर्शवली. यावरून समजते की पवार कुटुंबियांच्या राजकीय रथाचा ‘पार्थ’ नक्की कोण? हा संभ्रम निर्माण झालाय”, असा टोला महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन लगावण्यात आलाय.
“शरद पवारांनी नेहमीप्रमाणे जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याकडे कानाडोळा करून त्यांच्या वक्तव्याला मुक संमती दर्शवलीय”, असाही टोला भाजपकडून लगावण्यात आलाय.
अजित पवारांच्या ‘धर्मवीर’ विषयावर शरद पवारांनी असहमती दर्शवली,
यावरून समजते की पवार कुटुंबियांच्या राजकीय रथाचा ‘पार्थ’ नक्की कोण? हा संभ्रम निर्माण झालाय
बाकी शरद पवारांनी नेहमीप्रमाणे जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याकडे कानाडोळा करून त्यांच्या वक्तव्याला मुक संमती दर्शवली! pic.twitter.com/MlHNmkd9d2— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 4, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या संभाजी महाराजांबद्दलच्या भूमिकेवर स्पष्ट मत मांडलं होतं. संभाजी महाराज धर्मवीर होते, असं मत त्यांनी मांडलं होतं. पण औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुनही वाद निर्माण झाला होता. भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर निषेध व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, पत्रकारांनी शरद पवारांना जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी आपण विधान ऐकलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिली. याच मुद्द्यावरुन भाजपने अजित पवारांना डिवचलंय.
दरम्यान, संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर अजित पवारांनी आज स्पष्टीकरण दिलंय.
“छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याचं रक्षण केलं. स्वराज्यमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. त्याचं रक्षण संभाजी महाराज यांनी केले आहे. त्यामुळे स्वराज्य रक्षक म्हणालो त्यात मी अपशब्द वापरला नाही”, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
“मी माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, माझ्या वाचनात जे आले ते मी सांगितले आहे, मी काही इतिहास संशोधक नाही, मला युक्तिवाद करायचा नाही, इतिहास अभ्यासक यांचा हा विषय आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडलीय.