मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात नेहमी वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं. आतादेखील गिरीश महाजन यांनी खडसेंच्या टीकेवर अतिशय खोचक शब्दांत प्रहार केलाय. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. सत्ताधाऱ्यांना मस्ती आलेली आहे, ती जिरवावी लागेल, अशी टीका खडसेंनी केली होती. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंवर प्रचंड तिखट शब्दांमध्ये प्रहार केला.
“खडसे साहेब आमची मस्ती काढत आहात, तुमची मस्ती जिरली नाही का? तुम्ही काय होता, आता कुठे जाऊन बसलेले आहात? दहा-दहा मंत्रिपदं घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का?”, असे सवाल गिरीश महाजन यांनी केला. “तुमची मस्ती लोकांना बघितली आहे. साऱ्या बिल्डरने बघितली आहे. आता तुम्ही त्याचे फळ भोगत आहात. तुम्ही 30 ते 35 वर्ष भाजपात होता. सर्वात जास्त पदे तुम्ही भोगली”, असं गिरीश महाजन खडसेंना उद्देशून म्हणाले.
“सर्वात जास्त लाल दिव्याच्या गाड्या 15 ते 20 वर्ष सत्ता नसताना विरोधी पक्ष म्हणून भोगल्या आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली आहे का? तुम्हाला लोकांनी विधानसभेत पाडलं. दूध डेअरीतून हकललं, बँकेतून हाकललं. तुमचं काय राहिलं? आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत. देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत. पण तुमचं काय झालं? तुमचे हाल कोण खात आहे आज? हे जरा बघा”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी खडसेंना सुनावलं.
देवेंद्र फडणवीस यांना माफी मागायची सवय लावावी लागेल, असं वक्तव्य खडसेंनी केलंय. त्यांच्या वक्तव्याबाबतही पत्रकारांनी गिरीश महाजन यांना विचारलं. “हे बघा मनाचा मोठेपणा लागतो. पोलिसांनी जे केलं त्याचं समर्थन कोणी करणार नाही. तुम्हालाही माहिती आहे. ऐनवेळी तिथली परिस्थिती पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल. पण देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या, मंत्रालयातून सूचना दिल्या हे म्हणणं चुकीचं आहे”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.
“देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने माफी मागितली. पोलिसांकडून चूक झाली आहे. माफ करा. माफी मागायलाही मोठं मन लागतं. यालाही मोठंपण लागतं. मग यावरुन त्यांनी राजीनामा द्यावा, असं म्हणणं चुकीचं आहे”, असं महाजन म्हणाले.
“एका ओळीचा अध्यादेश काढून चालत नाही. हा विषय अध्यादेश काढण्यासारखा किंवा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेता येईल, असा नाहीय. आपण किती वर्ष लढतोय, किती वर्षांपासून मागणी होतेय. आमचं सरकार असताना चार वर्ष किती सर्कस करावी लागली आणि तरीही हे आरक्षण टिकवलं होतं. सेशन कोर्ट, हायकोर्टात टिकवलं. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा दुर्लक्ष झालं आणि आरक्षण टिकलं नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. आमचं सरकारच मराठा समाजाला न्याय देईल”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.