गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईच्या मागणीवर शिंदे गटाला भाजपचं उत्तर

| Updated on: Feb 05, 2024 | 5:31 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या 7 मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या सर्व मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर भाजपकडून आता भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईच्या मागणीवर शिंदे गटाला भाजपचं उत्तर
Follow us on

मुंबई | 5 जानेवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संबंधित प्रकरणानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या 7 मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या मंत्र्यांमध्ये शंभूराज देसाई, दादा भुसे, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांनी गणपत गायकवाड यांच्यावर भाजप पक्षाकडून कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या या मागणीवर आता भाजपकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई सुरु आहे. त्यांच्यावर कलम लावली आहेत. त्यांना अटक केली आहे. गणपत गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार जी काही कारवाई करायची आवश्यकता असेल ती कारवाई सरकारतर्फे शंभर टक्के होणार”, असं अतुल भातखळकर म्हणाले. यावेळी त्यांना गणपत गायकवाड यांच्यावर पक्षशिस्तीचं भंग केल्याच्या आरोपाप्रकरणी कारवाई होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

‘हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय’

“पक्षशिस्तभंग आमच्या पक्षाचे अंतर्गत विषय आहे. आमच्या पक्षामध्ये कोणीही शिस्तीचे अभंग केला तर त्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली असते. त्या समितीकडे ते प्रकरण जातं. त्यात आता कुठलाही निर्णय आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे नियमानुसार एका व्यक्ती कुठलाही कारवाईचा निर्णय घेऊ शकत नाही”, अशी भूमिका अतुल भातखळकर यांनी मांडली.

शिवसेना मंत्र्यांची गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी

शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. “आम्ही सर्व शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. गोळीबाराच्या विषय वेगळा. पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे तथ्यहिन, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही, असे आरोप केले. या आरोपांबद्दल आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं आहे. हे चुकीचं आहे. त्याअनुषंगाने भाजप पक्षाने योग्य ती कारवाई करावी, असं मत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली. शिवसेना मंत्र्यांच्या तक्रारीनंतर आता देवेंद्र फडणवीस आणि भाजप काय निर्णय घेतं ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.