कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 3 फेब्रुवारी 2024 : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरण चांगलंच भोवलं आहे. उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे गायकवाड यांना 11 दिवस पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. पोलिसांनी गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी करायची आहे. गायकवाड यांच्या आवाजाचे नमुनेही घ्यायचे आहेत, त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. पण कोर्टाने गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे.
गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायाधीश ए ए निकम यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये फक्त राजकीय वैमनस्याचा प्रश्न नाहीये तर जमिनीचा आणि पैशांचा विषय आहे.यासाठी सखोल तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
तर आरोपींचे वकील राहुल आरोटे यांनीही जोरदार युक्तिवाद केला. आरोपी गणपत गायकवाड यांच्या बॉडीगार्डकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर होतं. तो आमदारांसोबत 24 तास असतो. या गोळीबारामागे जीवे मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा युक्तिवाद आरोटे यांनी केला. तर मी गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुठलाही कट रचण्याचा प्रश्न नाही. यामध्ये कट रचण्याच कलम का लावण्यात आलंय? माझ्या मुलाला का अडकवण्यात आलंय? मी माझा गुन्हा कबुल करतोय. इतरांचा यामध्ये सहभाग नाही, अशी कबुली गायकवाड यांनी दिली आहे.
गायकवाड सराईत गुन्हेगार नाहीत. ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना कमीत कमी पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवादही आरोटे यांनी केला. यावेळी वकील आरोटे यांनी सीसीटीव्ही फुटेज लीक झाल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे गेले? सीनिअर पीआयच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज लीक कसं झालं? हे जाणूनबुजून करण्यात आलंय, असा दावा आरोटे यांनी केला.
महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. त्यावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सहा गोळ्या लागल्या असतील तर तसं प्रतिज्ञापत्र पोलिसांनी कोर्टात द्यावं, असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं.
यावेळी सरकारी वकिलांनीही जोरदार बाजू मांडली. हत्येचा प्रयत्न हे कलम लावण्यासाठी गंभीर जखमी व्हायलाच हवं असा कायदा नाही. प्राप्त परिस्थितीनुसार अस निष्पन्न होत आहे की, जीवे मारण्याच्या उद्देशानेच 5 ते 6 गोळ्या झाडण्यात आल्या. गणपत गायकवाड यांनी आधी फायरिंग केली. नंतर जवळ जाऊन बंदुकीच्या बटने मारहाण केली. पुन्हा फायरिंग केली असा गंभीर प्रकार घडला आहे. एवढं करूनही आरोपी गायकवाड मीडियाशी बोलले आणि हो मी केलं असं त्यांनी म्हटलंय. जखमी महेश गायकवाड अत्यंत गंभीर आहेत. त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याची गरज आहे. असं असतानाही आरोपींचे वकील म्हणतायत की गंभीर जखमी नाही? असा सवाल सरकारी वकिलांनी केला.
आरोपींच्या वकिलानी पोलीस स्टेशनमधील सर्व फुटेज सुरक्षित ठेवण्याची कोर्टासमोर मागणी केली. मागच्या एक महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावं. संपूर्ण पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही सुरक्षित ठेवण्याची वकिलांनी मागणी केली. आम्ही याआधी अनेकदा पोलीस स्टेशनला गेलो होतो. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. म्हणूनच सर्व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यात यावं. हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस स्टेशनच्या आवराचे सीसीटीव्ही सुरक्षित ठेवावे, अशी मागणी गायकवाड यांच्या वकिलांनी केली.