हा राजकीय ‘जुमला’ नाही, बुरखा वाटपावर जाधव यांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 13, 2024 | 12:55 AM

बुरख्यावरुन महायुतीत वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी भायखळ्यात बुरखा वाटप केलं. त्यावरुन भाजपनं आक्षेप घेतला आहे. बुरखा वाटपाची भूमिका मान्य नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. 

हा राजकीय जुमला नाही, बुरखा वाटपावर जाधव यांची प्रतिक्रिया
Follow us on

शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांनी मुस्लीम महिलांसाठी बुरखा वाटण्याच्या कार्यक्रम केला आणि भाजपनं तात्काळ आक्षेप घेतला. अशा प्रकारे बुरखा वाटपाची भूमिका भाजपला मान्य नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. यामिनी जाधव भायखळ्याच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या दक्षिण मुंबईतून पराभूत झाल्यात. ज्यात मुस्लीम मतांचा फॅक्टर महत्वाचा होता. त्यामुळं बुरखा वाटपाचा कार्यक्रम शिंदेंच्या शिवसेनेनं हाती घेतला का ?, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

लोकसभेत यामिनी जाधव यांचा पराभव

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंतांनी यामिनी जाधवांचा 52 हजार 673 मतांनी पराभव केला. दक्षिण मुंबईत येणाऱ्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून यामिनी जाधव आमदार आहेत. असं असतानाही स्वत:च्या भायखळा मतदार संघातून 46 हजार 66 मतांनी यामिनी जाधव पिछाडीवर होत्या.

मुस्लीम मतांच्या जोरावर उद्धव ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनीही केली होती. आता त्यांच्याच आमदारांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला बोलण्याची संधी मिळाली आहे.

महायुतीत अंतर्गत खटके

महायुतीत सध्या कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन अंतर्गत खटके उडत आहेत. कधी लाडकी बहीण योजनेचं श्रेय असो किंवा, अजित पवारांना सोबत घेणं असो. आता शिंदेंच्या शिवसेनेनं मुस्लीम महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्यानं, ठाकरेंच्या शिवसेनेआधी पहिली प्रतिक्रिया भाजपचीच समोर आली आहे.

जाधव यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव (तिचे पती आणि शिवसेना नेते) मुस्लिमांचा विश्वास जिंकण्यासाठी बुरखा, हिजाबचे वाटप करत आहेत, असे विरोधकांना वाटत असेल, तर हा राजकीय ‘जुमला’ नाही. यामिनी आणि यशवंत जाधव या दोघींना वारंवार फोन करूनही प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हते. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, त्यांचा पक्ष अशा कार्यक्रमांना अनुकूल नाही असे म्हटले आहे.