राज्यातील भाजपच्या 23 खासदारांचे रिपोर्ट लिफाफ्यात बंद, कुणाला मिळणार पुन्हा संधी; कुणाचा होणार पत्ता कट?

| Updated on: Feb 29, 2024 | 8:06 PM

भाजपच्या गोटातील मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या लोकसभा निरीक्षकांनी राज्यातील भाजपच्या सर्व 23 खासदारांचा कामाचा रिपोर्ट लिफाफ्यात बंद करुन दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील भाजपच्या 23 खासदारांचे रिपोर्ट लिफाफ्यात बंद, कुणाला मिळणार पुन्हा संधी; कुणाचा होणार पत्ता कट?
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : राज्यातील भाजपच्या 23 खासदारांचे रिपोर्ट लिफाफ्यात बंद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी आपली मतं दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत आज होत असलेल्या बैठकीत राज्यातील 23 खासदारांच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत कुणाला पुन्हा संधी द्यायची आणि कुणाचा पत्ता कट करायचा याबाबत निर्णय होणार आहे. राज्यात सध्या भाजपचे 23 खासदार आहेत. या सर्व खासदारांच्या कामाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी राज्यात वेगवेगळे निरीक्षक नेमण्यात आले होते. या निरीक्षकांनी आज दिवसभर आपापले अहवाल तयार केले आहेत. हे अहवाल आता बंद लिफाफ्यात दिल्लीला वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आले आहेत.

भाजपची आज राष्ट्रीय निवडणूक समितीची बैठक होतेय. या बैठकीत हे अहवाल सादर केले जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा कुणाला संधी मिळते हे या अहवालातून स्पष्ट होणार आहे. भाजपने निरीक्षक नेमून प्रत्येक मतदारसंघातील खासदारांचं रिपोर्टकार्ड तयार केलं आहे. लोकसभेचे निरीक्षक संबंधिक खासादारांच्या मतदारसंघात जावून माहिती गोळा करतील आणि लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेतील, असं काम या निरीक्षकांना देण्यात आलं होतं. त्यानुसार या निरीक्षकांनी प्रत्येक मतदारसंघात जावून जनभावना समजून घेतली. तसेच खासदारांचं कामकाज आणि सर्वसामान्य नागरिकांचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, तसेच विद्यमान खासदाराऐवजी आणखी कुणाला या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी दोन नावे या निरीक्षकांकडून रिपोर्टमध्ये देण्यात आली आहेत.

दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

दरम्यान, भाजपची आज नवी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप मुख्यालयात पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभेच्या जागांबाबत चर्चा होणार आहे. देशातल्या 21 राज्यांमधल्या जागांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. पण या 21 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, गुजरात यांसह 21 राज्यांमधल्या जागांबाबत आज महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.