मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपच्या स्टेजवर दिसणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवारही आहेत. अजित पवार यांचं भाजप काय करणार आहे हे माहीत नाही. युतीचं नेमकं गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाहीये. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधावरही प्रकाश टाकला आहे. नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जाण्यापासून शरद पवारांनी वाचवलं होतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे सलोख्याने संबंध राहिले आहेत. त्यामुळेच पवारांनी मोदी धार्जिणे राजकारण केलं आहे. मध्यंतरी पवार आणि मोदी एकाच मंचावर पाहायला मिळाले. मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादीत फूट पडली. त्यानंतर हे दोन नेते भेटले. तरीही दोघांची देहबोली सकारात्मक होती, याकडे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात जे काही घडत आहे. ते मोदी, शाह, शरद पवार आणि अजित पवार यांच्या सहमतीने घडत आहे. अजित पवार भाजपसोबत जाण्यास शरद पवार यांची सहमती आहे. शरद पवार बोलत नाहीत. पण सहमती असल्याशिवाय अजित पवार एवढं मोठं पाऊल उचलणार नाहीत, असंही राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं समजतं.
यावेळी मनसेने लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली आहे. लोकसभा मतदारसंघाची यादी तयार आहे. एक लोकसभा संघटक आणि 11 पदाधिकाऱ्यांची एक टीम असेल. ही 12 जणांची टीम प्रत्येक मतदारसंघात जाईल. जनमताचा कानोसा घेईल. त्याचा अहवाल पक्षाला देईल. त्यानंतर या मतदारसंघात राज ठाकरे दोन दौरे आणि चार सभा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत.