मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बारसूतील रिफायनरी प्रकल्पावरून शिंदे-भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी राऊत यांनी मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव सुरू असून हा डाव गुजरातमधूनच सुरू असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या साप्ताहिक सदरातून संजय राऊत यांनी हा हल्ला चढवला आहे. तसेच बारसूच्या लढाईत स्वार्थी राजकारण्यांचा पराभव होईल आणि निसर्ग जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रजेवरूनही टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर का गेले? त्यांनी रजेची सुट्टी कुणाकडून मंजूर करून घेतली? असा सवाल करतानाच एकनाथ शिंदे सातारा येथील त्यांच्या गावी जात असतात. रजा न घेताच जातात. मग त्यांना आताच रजा घेऊन जाण्याची गरज का पडली? दोन दिवस ते अदृश्य का राहिले, हे रहस्मय आहे, असं संजय राऊत म्हणाले. शिंदे यांचे सरकार म्हणजे 40 डोक्यांचा रावण आहे. हे समजून घेतले तर मुख्यमंत्री विश्रांतीसाठी रजेवर का गेले याचा उलगडा होईल. शिंदे रजेवर गेले त्यावेळी नक्की काय घडामोडी घडत होत्या? असं सूचक विधान करत राऊत यांनी बारसूतील आंदोलनाकडे लक्ष वेधले आहे.
राजापूरची गंगा, समुद्र आणि निसर्ग खराब करायला जे आले ते पुन्हा कधीच उभे राहू शकले नाहीत. रत्नागिरीचे पालकमंत्री उद य सामंत यांनी हे लक्षात घ्यायला हवे. कोकणचे मारेकरी म्महणून इतिहासात नाव राखायचे असेल तर विषाला विरोध करणाऱ्यांवर दंडुके चालवा नाही तर गोळ्या घाला. तुम्हाला जबर किंमत मोजावीच लागेल, असा इशाराच राऊत यांनी रोखठोकमधून दिला आहे.
पाताळगंगा येथे अंबानी यांचा प्रकल्प आहे. त्यासाठी कोकणातील लोकांनी जमिनी दिल्या. म्हणजेच कोकणातील लोक विकासाला विरोध करतात असं म्हणणं चुकीचं आहे. वेदांत फॉक्सकॉन, एअरबससारखे प्रकल्प महाराष्ट्रातून का गेले? त्याला तर कुणाचाही विरोध नव्हता. तरीही हे प्रकल्प का गेले? असा सवालच विचारण्यता आला आहे. उदय सामंत यांनी या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे, असं सांगतानाच मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहू नये यासाठी दिल्लीच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जागतिक पातळीवरील मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव गुजरातच्याच भूमीवरून सुरू आहे. हे रोखायची हिंमत रजेवर असलेल्या मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांमिध्य नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला आहे.