मुंबई : महाविकास आघाडी सरकारविरोधात आज (30 ऑगस्ट) भाजप मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिम येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच भातखळकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील बार, दारूची दुकाने, मॉल सुरू करणाऱ्या मात्र कोरोनाचे कारण पुढे करत मंदिरे उघडण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे यावेळी भाजपकडून सांगण्यात आले. (BJP Protest against Thackeray government; Atul Bhatkhalkar arrested before Shankhanad protest)
कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून राज्यातील मंदिरांचे दरवाजे बंद आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व निर्बंध शिथिल केले, मात्र, मंदिरं बंदच ठेवली. करोडो हिंदू भाविकांच्या श्रद्धेसोबतच मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. बार चालकांना करात सवलत देणाऱ्या ठाकरे सरकारने मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या सर्वसामान्यांना कोणतीही मदत दिली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. राज्यात सगळं काही सुरू आहे, मग या सरकारला धार्मिक स्थळांचं वावडं का? असा सवाल करत ठाकरे सरकारने अधर्मी वागणूक सोडून आता तरी मंदिरे उघडावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिरांची कुलुपं तोडण्याचे काम केले जाईल, असा इशारा अतुल भातखळकर यांनी यावेळी दिला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारु दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शंखनाद करण्यात येत आहे, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आयोजित केलेल्या शंखनाद आंदोलनात पाटील हे पुण्यात सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील मंदिर उघडण्यासाठी सद्बुद्धी मिळावी, यासाठी पाटील यांनी कसबा गणपतीला साकडं घालून गणपतीची महाआरती केली.
या आंदोलनात पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आमदार मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन सुरळीत झालं, त्यानंतरही सर्व सुरु झालं, मात्र मंदिरं सुरू झाली नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागत आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होण्याआधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याचे आग्रही होते. पण अल्पसंख्याकांच्या मतांसाठी धर्म न मानणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर मंदिरं उघडण्याला माझं प्राधान्य नाही, असं ते बोलून दाखवू लागले. आता त्यांना वारकऱ्यांचे श्रद्धाळूंचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यांना फक्त नोटांचे, नोटा देणाऱ्यांचे, दारुच्या दुकानदारांचे आवाज ऐकू येतात.”
पाटील म्हणाले की, “कोरोनाच्या दोन्ही लाटेत सर्वांनी निर्बंधांचं कटाक्षाने पालन करुन, सरकारला सहकार्य केलं. मात्र, कोरोनाची लाट ओसरु लागल्यानंतर हे सरकार लोकांना त्यांना जगण्याचा अधिकार नाकारु लागलं. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिरासंबंधित जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असतानाही राज्य सरकार डोळे झाकून बसली आहे.”
इतर बातम्या
ED Raid: शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, नोटीस न येताच ईडीच्या चौकशा सुरू; भावना गवळींचा गंभीर आरोप
पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंची खोचक टीका
(BJP Protest against Thackeray government; Atul Bhatkhalkar arrested before Shankhanad protest)