मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या, आंदोलनाची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्षांचे आदेेश

| Updated on: Feb 27, 2024 | 10:58 AM

महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कुणी केली? संपवून टाकू, निपटून टाकू याचे बळ कोणी दिले? मुख्यमंत्री, भुजबळ यांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली? हे समजणे महत्त्वाचे आहे, असं सांगतानाच अंतरवली सराटीत दगडफेक कुणी केली? त्यामागे कुणाचा हात आहे हे समोर आलं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या, आंदोलनाची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्षांचे आदेेश
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : अंतरवली सराटीत झालेल्या दगडफेकीचे आज विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानाची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तर अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामागे राष्ट्रवादी असेल तर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून विधानसभेत जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून लावू म्हणतात. ही भाषा वापरणारे तुम्ही आहात कोण? हा माझा सवाल आहे. कटकारस्थानाची ही योजना बनली कशी? मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का? जरांगे कुठं राहतात? तो कारखाना कुणाचा? ते दगड कुठूज आले? हे समोर यावं. अंतरवली सराटी दगडफेकप्रकरणाची एसआयटी चौकशी करा. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

न्यायामूर्तीची भूमिका घ्या

एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधतो. आपण आमचे पालनहर्ता आहात. आमची सुरक्षा सांभाळणे तुमची जबाबदारी आहे. कोर्टाने काल एक टिप्पणी केली. मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत कुणी तरी कोर्टात याचिका दाखल केली आहे. अशावेळी सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. सरकारने न्यायमूर्तीची भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाच्या भावना, मागण्या यावर दोन्ही सभागृहात दोन्ही बाजूने एकमत आहे. कायदा पण एकमताने केला आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा केली आहे. आपण महाराष्ट्राच्या हिताची चिंता करणारे आणि निर्णय घेणारे आहोत. अशावेळी जरांगे यांनी महाराष्ट्र बेचिराख करण्याची जी भाषा केली आहे. त्याची सरकारने दखल घेतली पाहिजे. काहीतरी कट रचला जात होता. आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं शेलार यांनी सांगितलं.

महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा नको

महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा कोणी करू नये. आमच्या भूमिकेशी विरोधी पक्ष सहमत असेल. छगन भुजबळ यांनाही धमक्या दिल्या. मराठा समाजाची बदनामी होतेय. पराक्रमी आणि संयमी म्हणून मराठा समाजाची ओळख आहे. कुठल्याही समाजाला नख न लावता मराठा समाजाचे हित जपले पाहिजे, ही भूमिका सर्वांची आहे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना भाषा मान्य आहे काय?

उपमुख्यमंत्र्यांबाबत जी भाषा वापरली जाते ती चुकीची आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला गेला. फडणवीस यांनी कधीच मानापमान ठेवला नाही. त्यांच्या भाषणातून कधीही ब्र काढला नाही. तरीही फडणवीस यांच्या विरोधात बोललं जात आहे. निपटून टाकू अशी भाषा वापरली जात आहे. ही भाषा मुख्यमंत्र्यांना मान्य आहे काय?, असा सवालही त्यांनी केला.

एसआयटी चौकशी करा

दरम्यान, शेलार यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.