‘आव्हाड डोक्यावर पडला आहे का?’, प्रभू रामावरील वादग्रस्त विधानावरुन टीकेची झोड

| Updated on: Jan 03, 2024 | 10:17 PM

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली. तसेच भाजपकडूनही जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

आव्हाड डोक्यावर पडला आहे का?, प्रभू रामावरील वादग्रस्त विधानावरुन टीकेची झोड
jitendra awhad
Follow us on

मुंबई | 3 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झालाय. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. “राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “शिकार करून खाणारा राम आमचा आहे. आम्ही आज मटण खातो. राम बहुजनांचा आहे. आम्ही रामाच्या पावलावर चालतो. 14 वर्ष जंगलात काय खाणार?”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केलीय. “आव्हाड डोक्यावर पडला आहे का? असं लोक आम्हाला विचारतात. आता तर आमची खात्रीच पटली आहे की लोक खरंच बोलतात. काय खाऊन बोलतोस तू तुझं तुला कळतं का? वाटेल ते बोलताना नरडं थोडं जळतं का? दिवस-रात्र मांसाहार ओरपणारा तू तुला कशी कळेल रामायणाची खरी कथा? तुझ्यासारखे नतद्रष्ट, रामाचं नाव घेतात, हीच राम भक्तांची व्यथा”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

“मोठे रामायणाचे दाखले देतोस ग्रंथ वाचला का विचारतोस तू? रामायणाचे सगळे ग्रंथ कोणी लिहिले कधी स्वतः बघतोस का रे तू? रामायण लिहिणारे बहुजनच होते. पण सत्य आणि धर्मनिष्ठ होते तुझ्यासारखे त्यांच्या डोक्यात नको ते किडे नव्हते. तूच एकदा डोक्यावरचा रुमाल काढून रामायण वाच आणि मग ज्ञान पाजळत गावभर थय थय नाच. अहो हिंदुत्ववादी ठाकरे साहेब, हे बरोबर बरोबर बोलतायत ना? तुमच्या हिंदुत्वाशी अगदी बरोब्बर नाळ जोडतायत ना”, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.

‘मी आव्हाड यांचे भाषण ऐकले नाही’, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

“मी आव्हाड यांचे भाषण ऐकले नाही. मी दुसऱ्या दालनात होतो , अभ्यासावे लागेल. त्यामुळे मी त्यावर काय भाष्य करणार? जर तरची उत्तरे कसं देणार? त्यांनी अगोदर काय संदर्भ दिला ते बघावे लागेल. तपासून बघू मग बोलू. देव आपला असतो असं म्हणण्याची पद्धत. ती आपुलकची भावना. त्यांचं वक्तव्य मी बघितलं नाही, योग्य वेळी बोलेल. शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

महंत सुधीरदास महाराज यांच्याकडून निषेध व्यक्त

नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला आहे. आव्हाडांचे वक्तव्य मूर्खपणाचं. प्रभू श्रीरामचंद्र फळं, मूळ खाऊन 14 वर्ष वनवासात राहिले. अयोध्यात सध्या राम मंदिराचे उद्घाटन होत असल्याने भक्तिमय वातावरण असताना राक्षसांना जसा त्रास होतोय, तसा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, अशी टीका महंत सुधीरदास महाराज यांनी केलीय.

‘आव्हाडांना मंत्री करण्यासाठी त्यांच्या पत्नी माझ्याकडे येऊन हात जोडत होत्या’

“जितेंद्र आव्हाड यांचं मला फार वाईट वाटतं. ते ओबीसी असूनही आत्तापर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत एक शब्दही बोलले नाहीत. एक शब्द बोलण्याची हिंमतही जितेंद्र आव्हाडांची झाली नाही. आव्हाडांना मंत्री करण्यासाठी त्यांच्या पत्नी माझ्याकडे येऊन हात जोडत होत्या. मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून मी शरद पवारांना सांगितले. हे आव्हाड लवकर विसरले. माझ्याविरोधात बोलण्यासाठी तुम्ही फार लहान आहात. तुम्ही तुमचं काम करा, एवढं उतावीळ होऊ नका”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

‘शरद पवार तुमच्या चेल्या चपाट्यांना सुधरायला सांगा’, तुषार भोसलेंची टीका

भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका केलीय. “शरद पवार आणि त्यांचा पक्ष कुठल्या थराला गेला पाहिलात ना? प्रभू श्रीरामांवर आव्हाडांनी गरळ ओकली आहे. दीड दमडीच्या राजकारणासाठी तुम्ही कुठल्या थराला जात आहात? शरद पवार तुमच्या चेल्या चपाट्यांना सुधरायला सांगा”, असं तुषार भोसले म्हणाले आहेत.