मुंबई: गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्यासाठी भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. दिल्लीत रविवारी शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांना अभय दिल्याची चर्चा आहे. (BJP slams NCP over Parambir singh letter bomb)
या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्यंगचित्र ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. या व्यंगचित्रात घाबरलेले अनिल देशमुख आणि त्यांच्यापाठी शरद पवारांची सावली दाखवण्यात आली आहे. अनिल देशमुख हे ‘काका मला वाचवा’ अशी हाक मारत असल्याचे दिसत आहे.
हे व्यंगचित्र ट्विट करताना भाजपने एक कॅप्शनही लिहली आहे. पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे. भाजपच्या या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीच्या दिशेने होता.
पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/JYPH56dBB3
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 21, 2021
राजनाधी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यावेळी पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे.
सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले. त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. पण मी त्या खोलात जात नाही. सध्या जे प्रमुख विषय आहेत त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असंही पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या:
अनिल देशमुख यांच्याविरोधात पहिली तक्रार दाखल, तक्रारीत शरद पवार यांचंही नाव
‘गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शाहांवर आरोप केले होते, तेव्हा भाजपने राजीनामा घेतला होता का?’
(BJP slams NCP over Parambir singh letter bomb)