मुंबई | 8 मार्च 2024 : भाजपकडून लोकसभेच्या मैदानात दोन माजी अधिकाऱ्यांना मैदानात उतरण्यात येणार असल्याची चर्चा आहे. धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी देखील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर धुळ्यात माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. डॉ. प्रताप दिघावकर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे आहेत. ते १९८७ मध्ये सटाणा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. पुणे ग्रामीण आणि रायगडमध्ये त्यांनी पोलीस अधिक्षक तर मुंबईचे उपायुक्त म्हणूनही काम पाहिल होतं. पोलीस महानिरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती झाली करण्यात आली होती. या काळात शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या कामाची राज्यभर चर्चा झाली. निवृत्तीनंतर दिघावकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली होती. 3 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान सध्या धुळे लोकसभेतून त्यांनी उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे..
सध्या धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे हे खासदार आहेत. दरम्यान या लोकसभेत त्यांचं तिकीट कापून दिघावकरांना तिकीट दिलं जाण्याची चर्चा सुरू आहे. 2019 धुळे लोकसभेत भाजपच्या सुभाष भामरेंविरोधात काँग्रेसचे कुणाल पाटील मैदानात होते. या निवडणुकीत सुभाष भामरेंना 6 लाख 10 हजार 268 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या कुणाल पाटलांनी 3 लाख 82 हजार 636 मतं घेतली होती. 2 लाख 27 हजार 632 मतांच्या फरकानं सुभाष भामरेंनी विजय संपादन केला होता.
धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. प्रवीण परदेशी हे माजी सनदी अधिकारी आणि सध्या मित्रा संस्थेचे सीईओ आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. अत्यंत प्रभावी आणि कार्य कुशल सनदी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. मे २०२० मध्ये मुंबई महापालिका आयुक्तपदावरून त्यांची बदली करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी ते केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मित्रा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक सामाजिक कामांमध्ये देखील प्रवीण परदेशी यांचं मोठं योगदान आहे. भाजपकडून प्रवीण परदेशींची चर्चा सुरु आहे. मात्र, भाजपसाठी धाराशिवचं मैदान मारणं सोप्प नाहीय. कारण धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलय.
उस्मानाबाद लोकसभेतून शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांना 5 लाख 91 हजार 605 मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांना 4 लाख 64 हजार 747 मतं मिळाली होती. जवळपास 1 लाख 26 हजार मतांच्या फरकानं ओमराजे निंबाळकरांचा विजय झाला होता. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे पीए अभिमन्यू पवारांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण परदेशी आणि प्रतापराव दिघावकर यांना तिकीट दिलं जाणार अशा चर्चांना उधाण आलंय.