मुंबई– राज्यातील सहा जागांसाठी १० जूनला होणाऱ्या ६ राज्यसभा खासदारांच्या (Rajysabha Election)निवडणुकांच्या निमित्ताने महाविकास आघाडीला लक्ष्य करण्याची संधी भाजपाने सोडलेली नाही. गेल्या वेळी राष्ट्रपती निर्देशित खासदारकी दिलेल्या संभाजीराजेंनी (Chatrapati SambhajiRaje)ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच, कार्यकाळ संपण्याआधीच राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केलीये. कोणत्याही पक्षात सामील न होता, अपक्ष निवडणूक रिंगणात असल्याचे त्यांनी जाहीर केले. इतकेच नाही तर यानिमित्ताने स्वराज्य नावाची संघटना उभारत असल्याची आणि आगामी काळात ती राजकीय पटलावरही सक्रिय होण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी काही दिवसांआधीच त्यांनी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे छत्रपतींना निवडणूक रिंगणात उतरवण्याचे भाजपाची (BJP Maharashtra)खेळी नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला झाला आहे.
खरंतर भाजपाने मनावर घेतले असते तर छत्रपती संभाजीराजेंना पुन्हा एकदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहज पाठवणे भाजपा पक्षश्रेष्ठींना शक्य झाले असते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजेंनी गेल्या दोन तीन वर्षांत ज्या भूमिका घेतल्या त्यामुळे या प्रश्नाचे नेतृत्व आता सद्यस्थितीत त्यांच्याकडे असल्यासारखेच आहे. अशा स्थितीत सरकारला धारेवर धरण्यासाठी भाजपाला त्यांची साथ नक्कीच हवी असणार, मात्र छत्रपती संभाजीराजेंनी भाजपापासून काही अंतर राखण्याचा निर्णयही घेतलेला असू शकतो. अशा स्थितीत भाजपा प्रणीत किंवा पाठिंब्याने खासदारकी नको म्हणून जरी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी भाजपाला त्यांचे मन वळवणे तसे फारसे अवघड नव्हते. मात्र या स्थितीत त्यांना राज्यसभेच्या रिंगणात अपक्ष उतरवण्यात भाजपाची खेळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने सहावी जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला न मिळता ती छत्रपती संभाजीराजेंना मिळाल्यास, राज्यसभेत त्यांचा भाजपासाठी उपयोग होऊ शकतो, त्यामुळे ही जागा भाजपाच्याच बाजूची होण्याची शक्यता आहे. तसेच यानिमित्ताने छत्रपतींना राज्यात महाविकास आघाडीत कोणकोणते पक्ष सहज पाठिंबा देतात, हेही राज्यातील जनतेच्या समोर येईल, अशीही भाजपाची खेळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच खेळीप्रमाणे घडलेही आहे.
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठइंबा देण्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. प्रथमदर्शनी त्यांना पाठिंबा देण्यात अडचण नाही, असे सांगत शरद पवारांनी या खेळीतून सुटका करुन घेतली असली तरी अंतिम निर्णय एकत्र बसून घएू असे त्यांनी सांगितले आहे. तर शिवसेनेने रपक्षात प्रवेश केला तरच पाठिंबा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेसने अद्याप याबाबत आपले पत्ते खुले केलेले नाहीत. या निमित्ताने महाविकास आघाडीतील फूट जनतेसमोर आली, असेच म्हणावे लागेल.
छत्रपती संभाजीराजेंना अपक्ष म्हणून भाजपाचा सहज पाठिंबा मिळेल असे वाटत असले, तरी याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर, पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंब्याचे गूढही आता कायम ठेवले आहे. एकूणच सहावी जागा शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नये, यासाठी भाजपा अखेरच्या क्षणापर्यंत यातला सस्पेन्स कायम ठेऊन ऐनवेळी छत्रपती संभाजीराजेंसाठी प्रयत्न करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यात सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना अडचणीत आणण्याचा भाजपाचा तूर्तास तरी प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागेल.