भुजबळ, वडेट्टीवार राजीनामा द्या; ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन

| Updated on: Jun 02, 2021 | 6:05 PM

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे. (bjp's obc morcha will protest against maharashtra government)

भुजबळ, वडेट्टीवार राजीनामा द्या; ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

राहुल झोरी, टीव्ही9 मराठी, मुंबई: राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाने केली आहे. तसेच राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही ओबीसी मोर्चाने केली आहे. (bjp’s obc morcha will protest against maharashtra government)

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होण्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असल्याने उद्या गुरुवारी ओबीसी मोर्चाच्यावतीने संपूर्ण राज्यात आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. लॉकडाऊनचे सर्व निर्बंध पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं योगेश टिळेकर यांनी सांगितलं.

मंत्र्यांना फिरू देणार नाही

येत्या महिनाभरात राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी करतानाच मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही तर आघाडी सरकारच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पडळकर काय म्हणाले?

दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली जात आहे. आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही. यावरून त्यांची भूमिका समजून येते, असं पडळकर म्हणाले. मराठा, ओबीसी आणि पदोन्नती या सर्व आरक्षणाला पवारच जबाबदार आहे. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै पाव्हण्यांचं पडलं आहे. या सरकारला बहुजन समाजाला उद्ध्वस्त करायचा आहे, असं सांगतानाच ओबीसी आरक्षण रद्द होण्यास हे सरकारच जबाबदार आहे. या सरकारने अजूनही मागासवर्गीय आयोग गठीत केला नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (bjp’s obc morcha will protest against maharashtra government)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: आरक्षण न मिळण्यास पवारच कारणीभूत, सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही; पडळकरांचा हल्लाबोल

VIDEO: संजय राऊत एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबद्दल रोज काय बोलायचं?; फडणवीसांचा टोला

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका

(bjp’s obc morcha will protest against maharashtra government)