मुंबई : मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नेते विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित आहेत. मुंबईत महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत १५० नगरसेवक निवडून येतील. या दृष्टीने भाजप नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या कार्याकाळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा राजकीय ठराव मांडण्यात आला. त्यानुसार प्रत्येक विभागात जाऊन हे मांडले जाईल. प्रत्येक वॉर्डामध्ये विरोधकांची स्थानिक पातळीवरील चुकीची कामे लोकांच्या निदर्शनास आणा, असे आवाहन भाजपच्या नेत्यांनी केले.
ज्या विभागात भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद नाही, त्याठिकाणी पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यात येईल. विविध कार्यक्रम राबवण्यासाठी निर्णय झाले आहेत. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहविण्यासाठी काम करण्याचा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
मुंबईतील मूलभूत सोयीसुविधा लोकांना मिळाल्यात का हे पाहा आणि त्या आपल्यामार्फत पोहचवा. असे आवाहनही भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर देण्याविषयी मार्गदर्शन झाले.
जिथे भाजपचा नगरसेवक तिथे भाजपचा उमेदवार दिला जाईल. जिथे सेनेचा तिथे शिंदे गट किंवा आपला चांगला उमेदवार देऊ. इतर पक्षाचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपला जोर लावावा. त्या जागा आपण लढवू असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे. ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी मांडले.
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, भाजपशी तुम्ही विश्वासघात केला म्हणून तुम्हाला भटकावे लागत आहे. भाजप या निवडणुकीत 150 जागा जिंकणार आणि भाजपचा महापौर बसणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक बूथमध्ये 11 जणांची समिती असेल. फ्रेंड्स ऑफ भाजप ही संकल्पना पुढे घेऊन जा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश चालवत आहेत. त्यांचे सारथी हे देवेंद्र फडणवीस आहेत. चांगल्या लोकांचा उपयोग कुठे, कधी कसं करून घ्यायचा आहे ते आशिष शेलार यांना माहीत आहे. लढाई सुरू झाली आहे. निवडणुकीच्या मूडमधून इथून बाहेर पडायचं आहे. आपल्या पक्षात रोज पक्ष प्रवेश होत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.