मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election)भाजपाने चांगलीच कंबर कसलेली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार निवडून (BJP third candidate will win)येणारच असा विश्वास भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत या निवडणुकींच्या रणनीतीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर शेलार बोलत होते. भाजपाचा उमेदवार निवडून येणार आणि शवसेनेच्या संजयचा पराभव होणार, असे सांगत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या संख्याबळाची रणनीती, योजना मुंबईतील बैठकीत पार पडल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला कोरोना झालेला असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन उपस्थित होते.
जे दररोज सकाळी उठून घोडेबाजार, घोडेबाजार असा आरोप करीत आहेत, ते तबेल्यात राहतात, अशी टीका त्यांनी संजय राूत यांच्यावर केली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याची टीका शिवसेनेसह इतरही काही पक्ष करीत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेपेक्षा भाजपाकड जास्त मते होती, तरीही शिवसेनेने ही निवडणूक लादली, असे सांगत आगे आगे देखो होता है क्या, असे शेलार यांनी सांगितले आहे.
काही अपक्ष आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव आणण्यात येतो आहे, असा आरोप शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना राऊतांचं हे विधान बालिश, पोरकटपणाचे आणि मुद्दामहून वेडसरपणाचे असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत, असेही शेलार म्हणाले. पराभव समोर दिसत असल्याने आत्तापासूनच त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेला स्वताच्या आमदारांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. स्वताच्या पक्षाच्या आमदारांना नजरकैदेत ठेवणारे लोकशाहीवर बोलतात, हा काय प्रकार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांवर विश्वास नसणाऱ्या महाविकास आघाडीकडून त्यांचा अपमान करण्यात येत असल्याची टीकाही शेलार यांनी केली. भाजपाचे काही आमदार संपर्कात असल्याच्या सतेज पाटील यांच्या वक्तव्यावर, कोल्हापुरातील त्यांचे आमदार त्यांनी आधी सांभाळावेत असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे. एकूणच राज्यसभा निवडणूक ही शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधीची ही निवडणूक पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारीही ठरणार, हे नक्की.