मुंबई : ज्या बनावट ऑडिरच्या हलगर्जीपणामुळे मुंबईतील सीएसएमटी रेल्वेस्थानकाबाहेरील पूल कोसळला आणि या दुर्घटनेत 6 निष्पाप नागरिक दगावले, त्याच ऑडिटरला मुंबईतील पुलांच्या दुरुस्तीचा सल्ला मागण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या या संतापजनक प्रस्तावावर आता सर्वस्तरातून टीका होऊ लागली आहे. सीएसटीएम येथील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड या कंपनीने दिलेल्या अहवालानुसार पुलांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने ठेवला असल्याने, पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
कुलाबा, ग्रान्टरोड, चंदनवाडी, भायखळा विभागातील पुलांच्या दुरुस्तीसाठी पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड या कंपनीकडे सल्ला मागण्यात आला आहे. पालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
गेल्या 14 मार्च रोजी हिमालय पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला.
हिमालय पूल कोसळून झालेली दुर्घटना बनावट स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडल्याचा ठपका ठेवून, या घटनेनंतर दोषी कंपनीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर भक्कम पुराव्याच्या आधारे कंपनीचा ऑडिटर निरजकुमार देसाई याला दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली. शिवाय, दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत टाकून, पॅनलवरुन हकालपट्टी करण्यात आली. असे एकीकडे असताना महापालिकेने एबीसीडी आणि ई विभागातील पुलांची आणि भुयारी मार्गाची किरकोळ दुरुस्तीसाठी पुन्हा डी. डी. देसाईचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पूल दुरुस्तीसाठी डी. डी. देसाईचा सल्ला घेण्याच्या प्रस्तावावर आगामी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार असून, त्यातच अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे या स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार वाद रंगण्याची शक्यता आहे.
कोणत्या पुलांच्या दुरुस्तीसाठी डी. डी. देसाईचा सल्ला घेण्याचा महापालिकेचा विचार?
चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग