मुंबई : मुंबई महानगरात आज (9 जून 2021) जोरदार पाऊस कोसळूनही रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला यश आले. समुद्राच्या भरतीवेळी जोरदार पाऊस कोसळून सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी लावलेले पंप तर कार्यान्वित होतेच, सोबतीला मुख्य 6 पर्जन्य जल उदंचन केंद्रांनीही अवितरपणे 7 ते 8 तास पावसाच्या पाण्याचा निचरा केला. यामुळे मुंबईत पूरस्थिती टाळण्याची मोलाची कामगिरी करण्यात पालिकेला यश आलंय. तसेच रस्ते वाहतुकीवर देखील विशेष परिणाम जाणवला नाही (BMC claim about success in prevention of flood situation in Mumbai by pumping water).
मुंबई महानगरामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व उपाययोजना केली आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्वतः विविध ठिकाणी भेटी देवून त्याची पाहणी करुन आवश्यक ते निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पर्जन्य जल उपसा कामकाजाची देखरेख करुन यंत्रणेला तातडीने सूचना केल्या.
या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “मुंबईतील पर्जन्य जल वाहिन्यांमधून प्रतितास 30 मिमी इतक्या वेगाने कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आहे. मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे प्रतितास 60 मिमी वेगाने पाऊस कोसळू लागला की नाले व पर्जन्य वाहिन्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाहून ते साचण्याची समस्या निर्माण होते. खासकरुन समुद्रातील भरतीप्रसंगी व विशेषतः सखल भागांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. त्यामुळे मुंबईच्या भौगोलिक व नैसर्गिक वैशिष्ट्यांचा विचार करुनच महानगरपालिका प्रशासन पावसाळ्याशी निगडित वेगवेगळ्या उपाययोजना करीत असते.”
मुंबई महानगरात बहुतांश ठिकाणी आज सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधी दरम्यान, अवघ्या 4 ते 5 तासांमध्येच जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. काही विशिष्ट परिसरांमध्ये अतिशय जोरदार पाऊस कोसळला. दुपारी 3 वाजेपर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीमध्ये मुंबईतील 9 ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये चेंबूर अग्निशमन केंद्र परिसर 297 मिमी, विक्रोळी अग्निशमन केंद्र परिसर 274 मिमी, एम/पश्चिम विभाग 269 मिमी, एच/पूर्व विभाग 262 मिमी, रावली कॅम्प 259 मिमी, एम/पूर्व विभाग 258 मिमी, धारावी अग्निशमन केंद्र परिसर 256 मिमी, सांताक्रूझ कार्यशाळा परिसर 249 मिमी आणि विलेपार्ले 240 मिमी याप्रमाणे पावसाची नोंद करण्यात आली आहे.
याच कालावधीमध्ये 200 मिमी पावसाची नोंद झालेल्या 10 विभागांमध्ये एफ/उत्तर विभाग, दादर, वेसावे (वर्सोवा), के/पश्चिम विभाग, एच/पश्चिम विभाग, मरोळ, अंधेरी, के/पूर्व विभाग, एल विभाग, एन विभाग यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त महानगरात ज्या ठिकाणी 150 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, त्यात कुर्ला, एस विभाग, भांडूप, मालवणी, गोरेगांव, दादर, नायर रुग्णालय, वरळी अग्निशमन केंद्र परिसर, वरळी, भायखळा आणि हाजी अली या ठिकाणांचाही समावेश आहे.
एकीकडे अवघ्या 3 ते 4 तासांमध्ये हा पाऊस कोसळत असताना, सकाळी 11.45 वाजता समुद्रात 4.16 मीटर उंच लाटांची भरती होती. साहजिकच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तसेच नाल्यांमधील पाणी समुद्रामध्ये जाणे शक्य होत नव्हते. अशावेळी पाणी साचण्यास सुरुवात होत असतानाच महानगरपालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या ठिकाणचे पंप कार्यान्वित केले. सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान संपूर्ण महानगरात मिळून 45 पंप पाण्याचा निचरा करत होते. तर दुपारी 1 ते 2 दरम्यान जोरदार पावसाच्या प्रसंगी 197 पंप सुरु होते. स्वाभाविकच ठिकठिकाणच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यास मदत झाली,” असे पी. वेलरासू यांनी नमूद केले.
वेलरासू पुढे म्हणाले, “फक्त पंपच नव्हे, तर महानगरपालिकेचे 6 पर्जन्य जल उदंचन केंद्र देखील सलग कार्यरत ठेवून पावसाचे पाणी समुद्रामध्ये जलदगतीने निचरा करण्यात यश आले. सकाळी 8 वाजता हाजी अली उदंचन केंद्रात 3, क्लिव्हलँड आणि लव्हग्रोव्ह उदंचन केंद्रात 2 तर ब्रिटानिया उदंचन केंद्रात एकच पंप सुरु ठेवण्याची आवश्यकता भासली. पावसाचा जोर वाढीस लागल्यानंतर पूर्ण क्षमतेने पंप सुरू करण्यात आले. यामध्ये इर्ला उदंचन केंद्रात 8, गजदरबंध आणि लव्हग्रोव्ह केंद्रात 6 तर ब्रिटानिया आणि हाजी अली उदंचन केंद्रात 3 पंप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले.”
यापैकी बहुतांश पंपद्वारे सलग 7 ते 8 तास अखंडपणे पाण्याचा उपसा करुन निचरा करण्यात आला. या कामगिरीमुळे मुंबई महानगरात पूर स्थिती ओढवली नाही. तसेच हिंदमाता या सर्वाधिक सखल भागातील वाहतूकही सुरळीत ठेवण्याची अपूर्व कामगिरी महानगरपालिका प्रशासनाने करुन दाखवली आहे. हिंदमाता परिसरातील दोन्ही पुलांदरम्यान सुमारे 1.2 मीटरने उंची वाढवणाऱया रॅम्पमुळे देखील ही वाहतूक सुरळीत राखता आली. महानगरपालिकेच्या रस्ते व पूल विभागाने बांधलेल्या या रॅम्पमुळे हिंदमाता पुलावरुन दिवसभर वाहतूक सुरु होती.
महानगरपालिकेचे पर्जन्य जलवाहिन्या खाते, रस्ते व पूल खाते आणि सर्व 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर चांगला समन्वय साधून एकंदर मुंबई महानगरात आजच्या जोरदार पावसानंतरही साचलेल्या पाण्याचा अतिशय वेगाने निचरा करुन पूर स्थिती टाळण्यात यश मिळवले आहे.
BMC claim about success in prevention of flood situation in Mumbai by pumping water