मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाचे बाजूने निर्णय देत शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह गेलेलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर पकड मजबूत झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.तसेच मुंबई महापालिका निवडणुकीचं भाकीत देखील केलं.”धनुष्यबाण आणि शिवसेना त्या गटाला दिलं आहे. मला अशी शक्यता वाटायला लागलेले की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना त्या गटाला दिलेलं आहे. म्हणजेच येत्या महिन्यात दोन महिन्यांमध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील.त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे.मुंबईच्या हाती भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे.”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं.
“मुंबई मिळवण्याचं त्यांचं स्वप्न कदाचित ते त्यांना धनुष्यबाण हाती देऊन करण्याचा प्रयत्न करताहेत. कदाचित उद्या ते आमचं मशाल चिन्हंही घेतील. पण मशाल आता पेटलेली आहे. जेवढा अन्याय यंत्रणांचा वापर करून तुम्ही आमच्यावर कराल. त्या प्रत्येक अन्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहाणार नाही, याची मला खात्री आहे. आजच्या पुरता तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे. पण ते कागदावरचं आहे. खरं धनुष्यबाण आहे ते आजही माझ्याकडे आहे आणि कायमचं माझ्याकडे आहे.”, असं उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं.
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल लागल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं होतं. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्हं देण्यात आलं होतं. आता एकनाथ शिंदे गट म्हणजेच शिवसेना यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बाजूने शिवसेनेच्या तिकीटावर जिंकलेल्या 55 विजयी आमदारांपैकी 40 आमदार आहेत. पक्षाच्या एकूण 47,82,440 मतांपैकी 76 टक्के मतदान म्हणजेच 36,57,327 मतांचे दस्तावेज शिंदे गटाना आपल्यासोबत असल्याचं शिंदे गटाने सादर केलं. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या 15 आमदारांकडे एकूण 47,82,440 मतांपैकी 11,25,113 मतं होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे संख्याबळ कमी पडलं. उद्धव ठाकरे गट फक्ट 23.5 टक्केच मत दाखवू शकलं.