गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, 12 हजार अधिकारी तैनात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त; क्युआर कोड स्कॅन करताच…

| Updated on: Sep 08, 2024 | 1:43 PM

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व श्री मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किना-यांवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, 12 हजार अधिकारी तैनात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त; क्युआर कोड स्कॅन करताच...
गणपती विसर्जनात डीजेवर डिसेबलची बंदी घालण्यात आली आहे. डीजेचा आवाज हा आरोग्यासाठी धोकादायक असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीच्या काळात डीजे वापरावर बंदी घालण्यात आलीय.
Follow us on

BMC Ganpati Visarjan Preparation : मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही अधिकाधिक विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी – कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.

श्रीगणेशोत्सव अंतर्गत स्वराज्य भूमी (गिरगांव चौपाटी) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत भाविकांसाठी विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी स्वराज्यभूमीला भेट देवून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व योग्य ते निर्देश दिले.

उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व श्री मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किना-यांवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.

प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिकाही सज्ज

महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ७२ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०९७ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२७ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

‘क्यूआर कोड’वरही मिळणार कृत्रिम तलावांची माहिती

याशिवाय ‘क्यू आर कोड’द्वारे देखील भाविकांना, गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ स्कॅन केल्यावर मुंबईतील कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅप लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे मुंबईतील यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे.