मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीय. ठाकरे गटाला वारंवार धक्क्यावर धक्के मिळताना दिसत आहेत. आतादेखील मुंबईतून एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी पेडणेकर यांचं वरळीच्या गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकरांसाठी हा खूप मोठा झटका मानला जातोय.
मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांचे एसआरए कायद्यानुसार कार्यलय आणि घर सील करुन एसआरए विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेवरुन गंभीर आरोप केले होते.
किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेतील सदनिका बळकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांचे वरळीतील संबंधित वादग्रस्त सदनिका सील केल्या आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी देखील ट्विटरवर माहिती दिलीय.
Maha Govt SRA, BMC today evicted & took possession of ex Mayor Kishori Pednekar ‘s Residence & Office at Gomata Janata SRA Worli
Pednekar had occupied tenements (Originally allotted to Slum Dwellers) illegally for more than 10 years
“Pednekar ko Hisab Dena Pada” @BJP4India pic.twitter.com/a09NB3Mnfm
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 22, 2022
किरीट सोमय्या यांनी नेमका काय आरोप केला होता?
किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पेडणेकर यांनी एसआरए योजनेतील 6 गाळे हडप केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी आपण दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती, असा दावा सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केलीय. पेडणेकर यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळले होते.
मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर किशोरी पेडणेकर यांची भूमिका काय?
दरम्यान, मुंबई महापालिकेने कारवाई केल्याची बातमी समोर आल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे.
“भाडेतत्त्वावर राहत होते. माझे कुठचेही गाळे नव्हते. कोणतेही गाळे माझे सील झालेले नाही. हे माहिती असूनसुद्धा किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवर जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केलेला आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
“गोमातातील जनता हे ओळखून आहे. त्या गरीब नागरिकांची न्यायालयीन लढाई अजून बाकी आहे”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.