मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी (BMC corona test Dharavi) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिका तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या घेणार आहे. कोरोानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचं हे फार महत्त्वाचं पाऊल आहे (BMC corona test Dharavi).
मुंबई महापालिकेची आज आढावा बैठक पार पडली. महापालिकेचे जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. सुरेंद्र सिगनापुरकर यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, धारावीतील 150 खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे येत्या 10-12 दिवसांत संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार आहे.
“2 खासगी डॉक्टर्स आणि 3 पालिका वैद्यकीय कर्मचारी असे 5 जणांचे पथक सुमारे 5000 नागरिकांची चाचणी करणार आहेत. अशा पथकांच्या माध्यमातून 10 ते 12 दिवसांत धारावीतील सुमारे साडे सात लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये त्वरित निदान झाल्यास बाधितांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उपचरारासाठी दाखल केले जाईल, तर लक्षणे आढळणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, धारावी पोलीस स्थानक आणि रुग्णालयांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलही लवकरच उभारण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
धारावीत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईत धारावी, वरळी लोअर परेल, भायखाळा, अंधेरी पश्चिम या ठिकाणी दाटीवाटीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली. धारावीत आतापर्यंत 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.