मुंबई: दिवाळीच्या काळात मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दादर आणि भायखळ्यातील जैन मंदिरांचे दरवाजे उघडणार आहेत. धनत्रयोदशी आणि भाऊबीजेदरम्यानच्या पाच दिवसांसाठी ही मंदिर खुली ठेवण्याची परवागनी देण्यात आली आहे. सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जैन मंदिरे खुली राहतील. मात्र, 15 मिनिटांच्या कालावधीत मंदिरात फक्त 15 लोकच सोडले गेले पाहिजेत, असा दंडक न्यायालयाने घालून दिला आहे. मात्र, मुंबई आणि लगतच्या परिसरातील इतर 100 मंदिरे खुली करण्याची विनंती मात्र न्यायालयाने फेटाळून लावली. (Jain temples in Mumbai will be open in Diwali festival season)
यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही पर्यूषण पर्वाच्या काळात जैन समाजाकडून मंदिरे सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, तेव्हा राज्य सरकारने या मागणीसाठी नकार दर्शविला होता.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील इतर प्रार्थनास्थळांसाठीही हाच न्याय लावला जाणार का, हे पाहावे लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने अनलॉक मोहिमेतंर्गत हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा दिली असताना मंदिरे का सुरु केली जात नाहीत, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.
मध्यंतरी भाजपच्या नेत्यांनी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराबाहेर या मागणीसाठी आक्रमक निदर्शन केली होती. त्यानंतरही राज्य सरकार दाद देत नाही हे पाहून भाजपचे नेते हा मुद्दा घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दारी पोहोचले होते. राज्यपालांनी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले होते. मात्र, कोरोनाचा धोका कायम असून तुर्तास मंदिरे उघडता येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून कोल्हापूरच्या तुळजापूर मंदिराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आध्यात्मिक आघाडीने याठिकाणी आंदोलन केले होते. मात्र, त्यामधून फार काही निष्पन्न झाले नव्हते.
संबंधित बातम्या:
दिवाळीआधी राज्यातील मंदिरे उघडा, अन्यथा दिवाळीनंतर कोर्टात याचिका दाखल करणार : सुजय विखे
रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा, श्रेयही तुम्हीच घ्या, हवं तर आम्ही ढोल वाजवून स्वागत करू: नांदगावकर
(Jain temples in Mumbai will be open in Diwali festival season)