मुंबई : महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांचा कार्यकाळ कधीचा संपला आहे. पण कोरोना संकट आणि इतर कारणांमुळे महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते, अशी चर्चा आहे. पण याबाबत काहीच निश्चित अशी माहिती समजताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे पुढच्यावर्षी लोकसभेची आणि त्यानंतर विधानसभेची देखील निवडणूक पार पडणार आहे. असं असताना महापालिका निवडणुकांना इतकी दिरंगाई का? असा सवाल करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात युक्तिवाद झाला.
मुंबईतील रहिवासी असलेले रोशन पवार यांनी या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक आयोगाची कृती ही देशद्रोही आहे. या निवडणुकांमधून जनतेला लोकप्रतिनिधी मिळणार आहेत. याशिवाय संविधानातील तरतुदींनुसार या निवडणुका पार पडतात. पण तशी निवडणूक आयोगाकडून घेतली जात नसल्याने राज्य निवडणूक आयोगाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली.
न्यायमूर्ती सुनील शुव्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवसे यांच्या खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी पार पडली. वकील प्रकाश आंबेडकर यांनी याचिकार्त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला. खरंतर या प्रकरणी दोन ते तीन वेळा सुनावणी पार पडली. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली. याचिकेत तथ्य नसल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलं.
एकीकडे मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली असली तरी याचिकेतला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका होणं अपेक्षित आहेत. कोरोना संकटामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पण कोरोना परिस्थिती नियंत्रणात येऊन आता बराच अवकाश झालाय. पण तरीही अद्याप महापालिकांची निवडणूक पार पडलेली नाही. निवडणुका पार पडत नसल्यामुळे शासन दरबारी नागरिकांचे मुद्दे घेऊन जाण्यासाठी लोकप्रतिनिधी नाहीत.
महापालिका निवडणुकांसाठी खरंतर अनेक पक्ष कामाला लागले आहेत. अनेक पक्षांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून यासाठी रणनीती आखली जात आहे. मुंबई हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक वारंवार आमनेसामाने येताना दिसत आहेत. या महापालिकेत ठाकरे गटाच्या हातून सत्ता हिसकावण्यासाठी भाजप आणि शिंदे गट मनसेसोबत युती करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात ते आगामी काळात स्पष्ट होईल.