मुंबई : राज्यातील 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा केली आहे. (Boys and girls below 18 years of age need Aadhar card, PAN card, school-college identity card for admission in mall)
राज्यात 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देतांना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सर्वसामान्य प्रवासी आणि खासगी नोकरदार वर्गासाठी 15 ऑगस्टपासून लोकलसेवा सुरू करण्यात आली असली, तरीही काल रविवार असल्याने आज आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने खासगी नोकरदार वर्गाने लोकल प्रवासाचा श्रीगणेशा केला. ज्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले असतील, अशाच प्रवाशांना कालपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
मागील वर्षभरापासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन, म्हणजेच मुंबईच्या लोकलची दारं अखेर 15 ऑगस्टपासून खासगी नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. मात्र यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
कोरोना लसीचं अंतिम सर्टिफिकेट दाखवून प्रवाशांना पास दिला जात असून यानंतर प्रवाशांनी आजपासून लोकल प्रवासाचा श्रीगणेशा केला आहे. 15 ऑगस्टपासून राज्य सरकारने या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा दिली होती. मात्र काल रविवार असल्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून खाजगी नोकरदार वर्गाने रेल्वे प्रवास सुरु केला. आज बँक हॉलिडे असल्यामुळे सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होती. मात्र खाजगी नोकरदार वर्गाने सकाळपासूनच रेल्वे प्रवासाला सुरुवात केली.
हे ही वाचा :
Mumbai Unlock Guidelines : मैदाने, उद्याने, चौपाट्या, हॉटेल आणि मॉल, आता सर्व सुरु, पण नियम काय?
(Boys and girls below 18 years of age need Aadhar card, PAN card, school-college identity card for admission in mall)