canon
Image Credit source: tv9marathi
अतुल कांबळे, TV9 मराठी : मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकाच्या जवळचा दीडशे वर्षाहून जुना कर्नाक (carnac)उड्डाण पुल गेल्या शनिवार व रविवार असा सलग 27 तासांचा मेगाब्लॅाक घेत मध्य रेल्वेने हटविला आहे. हा पुल जुना झाल्याने तो हटवून येथे नवीन उड्डाण पुलाची उभारणी केली जाणार आहे. मध्य रेल्वे (central railway) इतिहासाच्या खुणा जपण्यासाठी या पुलावर सापडलेले दगड जतन करणार आहे. परंतू या पुलाच्या शेजारी स्थानकाच्या अगदी भिंतीला लागून ब्रिटीशकालीन इतिहास उन्हा व पावसात पडून आहेत.
कर्नाक पुल एका मराठी माणसाच्या बांधकाम कंपनीने 1868 साली बांधला होता. आज भाऊचा धक्का ज्याच्या नावाने प्रसिद्ध आहे, त्या लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांच्या ‘भाऊ रसेल एण्ड कंपनी’ने पुलाचे हे बांधकाम केले होते. या पुलाला धोकादायक ठरल्याने 19-20 नोव्हेंबरला पाडण्यात आले.
या पुलाचे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषेत नाव आणि साल लिहीलेले सहा दगड जतन केले जाणार आहेत, मात्र मस्जिद स्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या ब्रिटीशकालीन तोफांविषयी विचारले असता या ताेफा शहराच्या हद्दीतल्या असून आमच्या हद्दीतल्या नसल्याने त्यांची जबाबदारी आमच्यावर नसल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
ब्रिटीशांनी त्यांचा ( fort) फोर्ट किल्ला 1967 मध्ये हटविला. ब्रिटीशकाळात येथे दारुगाेळा विभाग हाेता. नव – नवीन शस्रास्त्र येऊ लागल्याने साल 1900 नंतर तोफा वापरणे बंद झाले. ज्यावेळी देश स्वंतत्र झाला त्यावेळी ब्रिटीश देश सोडून जाताना त्यांची शस्त्रास्रे येथेच सोडून गेले, त्यामुळे त्यांच्या जागोजागी सापडलेल्या लोखंडी तोफांना काही जणांनी जतन केले, मस्जिद स्थानकात तर तोफेचा मंदिरासाठी वापर झाला आहे.
तर आझाद मैदानात क्रिकेटसाठी मैदान बनवितानाही जमिनीत अनेक तोफा सापडल्या. सेंट झेवियर महाविद्यालयात तसेच इन्कम टॅक्स कार्यालय, इम्पिरिअल सिनेमासमोर, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यासमोर या तोफांचे जतन केले आहे, तर काही तशाच पडून असल्याचे इतिहास तज्ज्ञ दिपक राव यांनी स्पष्ट केले.