मुंबई: राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार आहे. तशी घोषणाच आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
आज विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशनावर चर्चा झाली. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचं आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान आज जाहीर करण्यात आलं आहे.
या आधी सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा आग्रह विरोधकांनीही धरला होता. त्यावर मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांना हवाई प्रवास सुद्धा करण्यास मनाई करण्यात आल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता. तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसेल तर पुढील अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनीही या मागणीला संमती दिली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
दरम्यान, राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनावर कोरोनाचं सावट असल्याने अधिवेशनाचा कालावधी पाच दिवसांचा करण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. संसदेचं अधिवेशन अधिक काळ चालू शकतं तर राज्याचं अधिवेशन का चालत नाही? असा सवाल विरोधकांनी केला होता. तर अनेक राज्यांचे अधिवेशन कमी कालावधीचा होता असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. आज नागपुरात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख घोषित करण्यात आली. मात्र हे अधिवेशन किती कालावधीचं असेल हे अद्याप सांगण्यात आलं नाही. फेब्रुवारीतच त्याबाबतची माहिती दिली जाऊ शकते असं सूत्रांनी सांगितलं. शिवाय कोविडची स्थिती पाहूनच याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असंही सूत्रांनी सांगितलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 27 December 2021 pic.twitter.com/GFc4AJvllD
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2021
संबंधित बातम्या: