मुंबई : मुंबईत आता समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यासाठी समुद्राखालून सात किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी देशातील सर्वात मोठी टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहे. बीकेसी ते कल्याण शीळफाटा दरम्यान 21 किलोमीटर बोगदा तयार होत आहे. त्यातील 7 किलोमीटरचा बोगदा ठाणेखाडी खालील समुद्रात असेल. या 21 किलोमीटरच्या बोगद्यासाठी एकूण तीन टीबीएम मशीन (टनेल बोरिंग मशीन) लावण्यात येतील. त्यापैकी एक मशीन देशातील सर्वात मोठी असेल. यात 16 किलोमीटर बोगद्याचं काम तीन मशीनद्वारे केली जाईल. ही सर्वात मोठी टीबीएम मशीन 13.1 मीटर व्यासाची असणार आहे. यापूर्वी कोस्टल रोडसाठी 12 व्यासाची टीबीएम मशीन वापरण्यात आली होती. अफकॉन्स कंपीनीने हे काम हाती घेतलं आहे.
अफकॉन्स कंपनी या आर्थिक वर्षात विविध भूमिगत मेट्रो प्रकल्पांसाठी तब्बल 20 टनेल बोरिंग मशीन (TBM) तैनात करणार आहे. या वर्षी एकूण 17 टीबीएम तैनात केले जाणार आहे. आणखी तीन पुढील वर्षीच्या सुरुवातीला तैनात केले जाणार आहेत, अशी माहिती अफकॉन्सचे कन्स्ट्रक्शन प्लांट आणि इक्विपमेंट विभागाचे संचालकव्ही मणीवन्नन यांनी दिली. या सर्व टीबीएम अफकॉन्सच्या मालकीच्या आहेत. एकाच वेळी इतक्या टिबीएम्सची मालकी आणि तैनात करणारी अफकॉन्स ही कदाचित देशातील एकमेव कंपनी असेल, असा दावाही मणीवन्नन यांनी केला.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने अलीकडेच अफकॉन्स सोबत भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा (first undersea rail tunnel) बांधण्यासाठी करार केला आहे, तो मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) प्रकल्पासाठी 21 किमी लांबीचा बोगदा आहे. ठाणे खाडीच्या तिथे समुद्राखालील बोगदा 7 किमी लांब आणि जमिनीच्या पातळीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खाली असेल. 16 किलोमीटरचा बोगदा टीबीएम वापरून पूर्ण केला जाईल आणि पाच किलोमीटर न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडॉलॉजी (NATM) वापरून बांधला जाईल.
आम्ही नियोजनबद्ध रित्या उपकरणे वापरली आहेत. ही उपकरणे सामान्य स्वरूपाची नाहीत. आमची बरीचशी उपकरणे कस्टम बिल्ट आहेत आणि म्हणूनच आम्ही तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प हाती घेण्यास सक्षम आहोत आणि ते वेळेवर किंवा वेळेच्या आधी पूर्ण करू शकतो, असं मणिवन्नन यांनी स्पष्ट केलं. हाय स्पीड रेलच्या सी2 पॅकेजच्या बांधकामासाठी सर्वात मोठ्या टीबीएम पैकी एक तैनात केली जाईल.13.1 मीटर व्यासासह स्लरी टीबीएम (Slurry TBM) तैनात केली जाईल. ती देशातील सर्वात मोठ्या टीबीएम पैकी एक असेल, असेही मणिवन्नन यांनी सांगितलं.
बोगद्याचा समुद्राखालचा भाग इंटरटाइडल (intertidal) क्षेत्राखाली येईल हे लक्षात घेता, पाण्याचा दाब जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यंत जास्त ओव्हरबर्डन (overburden) असू शकते. तथापि, अफकॉन्सने याआधी पाण्याखालील बोगदे प्रकल्प राबवले आहेत आणि कोलकाता येथे नदीच्या खाली देशातील पहिले पाण्याखालील मेट्रो बोगदे बांधण्याचा श्रेय त्यांच्याकडे आहे. अफकॉन्सने तीन भूमिगत मेट्रो स्टेशन बांधले जे प्रत्येकी 3.8 किमीच्या दोन भूमिगत बोगद्याने जोडलेले आहेत. बोगद्यांचा एक भाग — जवळपास 520 मीटर — हुगळी नदीच्या खाली आहे.
कोलकात्यातील पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पातील पाण्याखालील बोगदे ही अफकॉन्सची सर्वात मोठी कामगिरी आहे. आम्ही हा प्रकल्प गजबजलेल्या टोपोग्राफी (topography)अंतर्गत राबविला. नदीच्या क्षेत्रापूर्वी आणि नंतर, बोगदे अनेक मोडकळीस आलेल्या इमारती, रेल्वे कार्यालये आणि यार्ड, व्यस्त रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि हेरिटेज स्ट्रक्चर्सच्या खाली गेले.
आमच्या अत्यंत अनुभवी बोगद्याच्या टीमने हे सुनिश्चित केले की थोडेसे पाणी शिरल्यास टीबीएम (TBM) पाणबुडीप्रमाणे बंद करण्याची तरतूद आहे. पाण्याखालील बोगदे 66 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले, असंही त्यांनी सांगितलं.
हाय स्पीड रेल सी2 टनेलिंग पॅकेज कठीण आहे. कारण ते केवळ देशातील पहिला समुद्राखालचा बोगदा बांधण्याचे काम करत नाही, तर BKC आणि विक्रोळी यांच्यातील अलाइनमेंट अत्यंत शहरी भागातून जाते ज्यामुळे भूमिगत बोगदा एक अवघड बाब बनते. शाफ्ट उत्खनन आव्हानात्मक देखील होऊ शकते, कारण शाफ्टची खोली 50 मीटरच्या पुढे जाऊ शकते.