कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून वारंवार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला जातोय. विशेष म्हणजे सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांना मोठा धक्काच दिल्याचं मानलं जात आहे. कारण संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजीत पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इटर्नल हेल्थकेअर कंपनीविरोधात गुन्हा दाखल झालाय. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
मुंबई महापालिकेचे कोरोना काळात वेगवेगळे टेंडर निघत होते. त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी याआधी देखील एका कंपनीच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी इटर्नल हेल्थकेअर कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे सुजीत पाटकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
“संबंधित कंपनी बनावट पद्धतीने तयार करण्यात आलीय. आणि त्याच माध्यमातून टेंडर मिळवण्यात आले”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. संबंधित कंपनीत सुजीत पाटकर हे भागीदार असल्याची माहिती समोर आलीय.
इटर्नल हेल्थकेअर कंपनीविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी किरीट सोमय्या यांनी आजसुद्धा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. मात्र त्यााधीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आलीय.
किरीट सोमय्या यांनी गेल्या अडीच वर्षात अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचाही समावेश होता. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांनंतर ईडी, सीबीआयने कारवाई केल्याचीदेखील माहिती समोर आल्याचं बघायला मिळालं आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुकतंच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आणि कारखान्यावर धाड टाकली होती. ईडी अधिकांनी मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची तब्बल बारा तास चौकशी केली होती. विशेष म्हणजे सोमय्या यांनीच मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते.