सर्वात मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने तपास केलाच नाही, ‘त्या’ बातम्या खोट्या, CBIकडून अधिकृत स्पष्टीकरण

| Updated on: Dec 24, 2022 | 8:19 PM

सीबीआयकडून दिशा सालियन प्रकरणावर अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलंय.

सर्वात मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने तपास केलाच नाही, त्या बातम्या खोट्या, CBIकडून अधिकृत स्पष्टीकरण
दिशा सालियन
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची दिवगंत माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावर आता सीबीआयकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. दिशा सालियन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळेलं नाही. या प्रकरणावर सीबीआयने कधीच चौकशी केलेली नाही, असं स्पष्टीकरण सीबीआयकडून देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने तपास केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण सीबीआयकडून या प्रकरणावर कोणताही तपास झाला नसून तसा काहीच निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असं सांगण्यात आलंय. सीबीआयच्या या स्पष्टीकरणाने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण भाजपकडून या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय.

सीबीआयकडून दिशा सालियन प्रकरणावर अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

“दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही. हे प्रकरण सीबीआयकडे कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही”, असं सीबीआयने आपल्या अधिकृत जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

सुशांतची गर्लफ्रेंड दिशा सालियन हिला AU नावाने 43 फोन आले होते. ते AU म्हणजे आदित्य उद्धव असं बिहार पोलिसांच्या तपासात समोर आल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला होता.

राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार आक्रमक झाले होते. त्यांनी लोकसभेच्या कामकाजातून शेवाळे यांचं विधान हटवण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. ती मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली होती.

विधानसभेतही वातावरण तापलं

दुसरीकडे विधानसभेतही या मुद्द्यावरुन सभागृहातील वातावरण तापलं होतं. भाजप नेत्यांनी दिशा सालियन प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. भाजपच्या महिला आमदारांनीही चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांच्या निर्णयावर टीका केली होती. दिशा सालियन प्रकरणावर सीबीआय आणि मुंबई पोलिसांनी तपास करुन तिने आत्महत्या केल्याचं तपासात स्पष्ट झाल्यानंतरही या प्रकरणावर एसआयटी चौकशी केली जात असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं.