राज्य सरकारचा शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय, आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना CBSE अभ्यासक्रम

| Updated on: Mar 20, 2025 | 5:28 PM

CBSE curriculum: राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितीने सीबीएसई अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लागू करण्यास मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली.

राज्य सरकारचा शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय, आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना CBSE अभ्यासक्रम
CBSE
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

राज्य सरकारने शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितीने सीबीएसई अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लागू करण्यास मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली. येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच म्हणजे २०२५-२०२६ या वर्षामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

आराखड्यास मान्यता

राज्यात सीबीएसई शाळांमध्ये शिक्षणाचा बाजार मांडला आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क काही शाळा घेत असतात. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी सीबीएसई प्रणालीचे शिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण सुरु करण्यासंदर्भात सुकाणू समिती नेमली होती. या समितीने राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परीषदेत ही माहिती दिली. याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी प्रश्न विचारला होता. त्याला दादा भूसे यांनी उत्तर दिले.

तिसरी ते बारावीपर्यंत होणार सुविधा

राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्याला लेखी उत्तर दादा भुसे यांनी दिले आहे. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील किती शाळा सीबीएसई अभ्यासक्रम यावर्षी सुरु करणार? याबाबत कोणतीही माहिती अजून स्पष्ट झाली नाही. परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता दोन्ही बोर्डाचे पर्याय मिळणार आहे. यामुळे कमी शुल्कात विद्यार्थ्यांनी सीबीएसईचे शिक्षण घेता येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.