मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची हिरमोड करणारी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या डाऊन साईडला धिम्या मार्गावरील गाड्या प्रचंड उशिराने धावत आहेत. विशेष म्हणजे धिम्या मार्गावरील दोन गाड्या कॅन्सल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामारे जावं लागत आहे. गाड्या उशिराने येत असल्याने प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सातत्याने अशा घटना घडत असतात. रात्री आठची वेळ ही गर्दी वेळ असते. अनेकजण आपलं ऑफिसचं काम संपवून घराच्या वाटेला लागतात. पण अशाचवेळी लोकल ट्रेन उशिराने धावत असली किंवा लोकल ट्रेन रद्द झाल्या तर चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप होतो. आतादेखील चाकरमान्यांना तशाच मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.
विशेष म्हणजे या आठवड्याच्या पहिल्याच दिवसी मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी समोर आली होती. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच कपलिंग तुटल्याने कसाऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला. त्यामुळे कल्याणहून कसाऱ्याच्या दिशेला जाणारी वाहतूक बंद पडलेली. कसाऱ्याहून अनेक जण मुंबईत कामानिमित्ताने येतात. याशिवाय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.