मुंबई : मध्य रेल्वेनं आज प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक (Central Railway Mega block) घेण्यात येतो आहे. पहाटे पाच वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा महामेगाब्लॉक घेण्यात येतो आहे. मध्य रेल्वेच्या बहुप्रतिक्षित अशा पाचव्या आणि सहाव्या लाईनसाठी हा मेगाब्लॉक घेतला जात असून यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कळवा (Kalawa) आणि दिवा (Diwa) दरम्यान, अप आणि डाऊन स्लो लाईनवर (Slow Line) हा ब्लॉक घेतला जातो आहे. दरम्यान, ब्लॉक काळात मध्य रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम जाणवण्याची दाट शक्यता आहे. या काळात मध्य रेल्वेच्या गाड्या या अपेक्षित वेळेपेक्षा उशिरानं धावण्याचीही शक्यता आहे.
ब्लॉक दरम्यान, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. कळवा मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याणहून चढण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेप्रशासनानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष बससेवाही ब्लॉक दरम्यानच्या काळात चालवली जाणार आहेत.
ब्लॉकदरम्यान, डोंबिवलीहून कोणतीही लोकल सुटणार नाही. त्याचप्रमाणे धीमी लोकल या ठाणे, डोंबिवली आणि दिव्यातील फास्ट प्लॅटफॉर्मवर थांबणार आहेत. तर मुंब्रा स्टेशनच्या नव्या प्लॅटफॉर्मवर थाभणार आहेत.
24 तासांच्या मेगाब्लॉकमुळे अमरावती-मुंबई एक्सप्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आणि नांदेड-मुंबई राज्यरानी एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी धावणाऱ्या मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-अदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्विन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मुंबई-गडग एक्सप्रेस आणि मुंबई-नांदेड राज्यरानी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सोमवारी धावणाऱ्या अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस आणि गडग-मुंबई एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
दादर-हुबळी एक्सप्रेस यात्रा ही गाडी पुण्याहून रवाना होईल. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेसही रविवारी पुण्याहून रवाना केली जाणार आहे.